Pankaja Munde : पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या घरी समर्थकांची लागली रीघ, भेटायला आलेल्या समर्थकांना अश्रू अनावर
पंकजा मुंडे पुढील आठवड्यात आभार दौरा करणार आहे. सर्व तालुक्यात जाऊन मतदारांची भेट घेणार आहे. निवडणुकीत अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
बीड : मराठा आंदोलनामुळे (Maratha Reservation) हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Election) भाजपच्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी विजय मिळवला. बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली. निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर मागच्या दोन दिवसापासून परळीतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेटण्यासाठी रीघ लागली आहे.पंकजा मुंडे यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.
पराभवानंतर पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी समर्थकांची त्यांच्या निवासस्थानी रिघ लागली आहे. पराभव जिव्हारी लागल्याने पंकजांना भेटायला आलेल्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. अवघ्या साडेसहा हजार मताने पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर हा पराभव कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. मुन्ना पकजा मुंडे यांना भेटण्यासाठी आलेले कार्यकर्त्यांना आपली अश्रू अनावर होत आहेत. मतदान आणि मतमोजणी दरम्यान पंकजा मुंडे या परळीमध्ये राहिला होत्या.
पंकजा मुंडेंचा पुढील आठवड्यात आभार दौरा
आज कुटुंबासमवेत पंकजा मुंडे विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या त्यावेळी भेटण्यासाठी त्यांच्या घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांची डोळे पाणावले होते. पंकजा मुंडे पुढील आठवड्यात आभार दौरा करणार आहे. सर्व तालुक्यात जाऊन मतदारांची भेट घेणार आहे. निवडणुकीत अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजा मुंडेंनी भावना व्यक्त केल्या.
संघर्षात न घाबरता लढा देणाऱ्यांचे पंकजा मुंडेंनी मानले आभार
पक्षाच्या बैठका असल्याने मी मुंबई, दिल्लीला चालले आहे त्यानंतर मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे. तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी! संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी मानले मतदारांचे आभार
सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या. माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि त्या 6 लाख 77 हजार मतदारांचेही मनापासुन आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला मतदान केलं. या देशामध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेली जागा बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली पहिल्या अथवा दुसऱ्या नंबरची माझी जागा असेल, म्हणजे इतकी टफ फाईट अत्यंत विपरित परिस्थितीत मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर..