(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Patil : लेक आरक्षणासाठी मुंबईत, आई मात्र लेकराच्या काळजीने भावूक, जरांगेंच्या आईचं सरकारला आवाहन
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या आईने सरकारला लवकरात लवकर आरक्षण देण्याचं आवाहन केलं आहे.
बीड : सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं आवाहन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आई प्रभावती जरांगे यांनी केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे हे आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करतायत, मात्र ते आता मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यामुळे लेकराची काळजी वाटते, असं म्हणत मनोज जरांगे यांच्या मातोश्री भावूक झाल्या आहेत. सरकार फक्त आरक्षण देतो असं म्हणतंय, पण आता प्रत्यक्षात सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी देखील मनोज जरांगे यांच्या आईने केलीये.
पप्पांची खूप काळजी वाटते, आता त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. सरकारमुळेच उपोषणाला बसायची वेळ येतेय. आता पुन्हा त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहत जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच केलीये. अंतरवाली सराटीमधून 20 जानेवारी निघालेला हा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर आलाय. परंतु आता मुंबईत या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आलीये.
कुटुंबियांनी व्यक्त केली काळजी
दरम्यान आता त्यांच्या कुटुंबियांनी देखील काळजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलाय. पण आझाद मैदानावर आंदोलन करण्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम हा वाशी येथे असणार आहे. त्यानंतर हे आंदोलन 26 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करेल. पण या आंदोलनाला परवानगी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी का नाकारली?
पोलिसांनी दिलेल्या पत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. त्यामुळे आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे.