
आधी गावाचा रस्ता मगच सरपंच पदाचा पदभार, नवनिर्वाचित महिला सरपंचांच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा
Beed News: जोपर्यंत आपल्या गावाचा रस्ता होत नाही, तोपर्यंत गावाच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचा इशारा नवनिर्वाचित महिला सरपंचांने दिला आहे.

Beed News: राज्यातील सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Election) निकाल मंगळवारीसमोर आली आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतचे कारभारी देखील ठरले आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील (Beed District) एका ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाने (Women Sarpanch) पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आपल्या गावाचा रस्ता होत नाही, तोपर्यंत गावाच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचा इशारा देत असे निवेदनच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. कस्तुराबाई साला पवार असे या महिला सरपंच यांचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गांजपुर येथील ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले तर 20 डिसेंबरला मतमोजणी झाली. यावेळी कस्तुराबाई साला पवार यांची जनतेतून सरपंच पदावर निवड झाली. दरम्यान राज्यभरातील नवनिर्वाचित सरपंच आपल्या पदाचा पदभार स्वीकारत असतानाच कस्तुराबाई यांनी मात्र पदभार स्वीकारण्यास नकार दिला. गांजपूर ते तांबवा रस्त्याचे काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पदभार स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची परिसरात चर्चा पाहायला मिळत आहे.
जिल्हाधिकारी यांना दिले निवदेन...
गांजपुर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच कस्तुराबाई साला पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, गांजपूर व तांबवा रस्ता क्र. 32 हा अतिरहदारीचा असुन या रस्त्याच्या बाजुला दाट लोक वस्ती आहे. परंतु हा रस्ता अत्यंत खराब व मोठ मोठे खड्डेयुक्त झालेला आहे. यामुळे दोनचाकी, चारचाकी वाहनांना व पायी चालणे देखील अशक्य होत आहे. या रहदारीच्या अडचणीमुळे अनेकांच्या जिविताला धोका झालेला आहे. मी गांजपूर गावची नवनिर्वाचीत सरपंच असुन मी पारधी समाजाची आहे. माझी पारधी वस्ती याच रस्त्यावर दोन कि.मी अंतरावर असून तेथुन मला गावात जाऊन दैनंदिन कामकाज करणे अशक्य आहे. त्यामुळे गांजपूर तांबवा रस्ता तात्काळ मजबुतीकरण डांबरीकरण करावा अन्यथा आम्ही सरपंच पदाचा पदभार स्विकारणार नाही, असे या निवदेनात म्हटले आहे.
गावकऱ्यांचे हाल...
गांजपूर व तांबवा रस्ता क्र. 32 हा अतिरहदारीचा असुन यावरून रोज शेकडो वाहने जातात. मात्र असे असतांना रस्ता खराब झाला असून, यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यात पावसाळ्यात या रस्त्यावरून गाडी चालवणं शक्य होत नाही. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे आता निवडून आल्यावर पहिल्यांदा आपल्या गावातील रस्त्याचे काम करण्याचा निर्णय नवनिर्वाचीत सरपंच कस्तुराबाई यांनी घेतला आहे.
Gram Panchayat Election: ईव्हीएम मशीनमध्ये टाकलं चक्क फेविक्विक, बीडमधील धक्कादायक प्रकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
