Beed Guardian Minister : पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होताच धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, पत्ता कट होताच म्हणाले...
Maharashtra Guardian Ministers List : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमावर मोठी पोस्ट लिहिली आहे.
Dhananjay Munde : राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता या यादीतून कट करण्यात आला आहे. त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचा कारभार सोपवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. असे असतानाच पालकमंत्र्यांची नावे जाहीर होताच, धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले असून मीच मला कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिद नको अशी विनंती केली होती, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह बीड जिल्ह्याचाही कारभार ते पाहणार आहेत. ही यादी जाहीर झाल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी विनंती मी केली होती. ती मान्य करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडेंच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025
बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT
याचा मला आनंद वाटतो
तसेच, बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्यात.
मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको
यासह सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
बीड जिल्ह्यात भविष्यात नेमके काय होणार?
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी अजित पवार यांनी पालकमंत्री व्हावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार जनतेची भावना लक्षात घेता अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, त्यानंतर आता बीड जिल्ह्यात भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी