Beed News : धनंजय, पंकजा मुंडेंसह नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर; 'अहंकारा'वरून रंगला सामना
Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडे, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते.
Beed News : अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी येथे नारळी सप्ताह निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) , भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार असल्याची खोचक टीका नामदेव शास्त्री यांनी केली. तर त्यांच्या याच टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील शास्त्रींना जशास तस उत्तर दिले. त्यामुळे 'अहंकारा'वरून रंगलेल्या या सामन्याची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी येथे नारळी सप्ताह निमित्ताने मुंडे भाऊ बहिण आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. दरम्यान यावेळी बोलताना नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना म्हटले की, "पंकजाला मी मुलगी मानलं आहे. त्यामुळे मी तिच्या विरोधात कधीच जाणार नाही. मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोरपणा करतात. तर दुसरीकडे पंकजाने देखील आपला अहंकार कमी करावा असा सल्ला भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना दिला. तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांचाही आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र त्यांनी कोणालातरी मानलं पाहिजे आणि कोणाचा तरी ऐकलं पाहिजे असं देखील शास्त्री म्हणाले. तसेच तुम्ही कितीही मोठे झालात याचा तुम्हाला स्वाभिमान असावा मात्र अहंकार नसावा असा खोचक टोला देखील शास्त्रींनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
शास्त्रींच्या टीकेला पंकजा मुंडेंचं उत्तर...
दरम्यान नामदेव शास्त्री यांनी केलेल्या टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणातून जशास तसं उत्तर दिले. अहंकारावरून शास्त्रींनी पंकजा मुंडे यांना डिवचल्यानंतर पंकजा मुंडेंनीही आपल्या नेहमीच्या शैलीत शास्त्रींना भाषणातूनच सुनावले. 'मी एका स्त्रीच्या रूपात जन्माला आले आहे. मी जर जोरात बोलले तर हा अनेकांना अहंकार वाटतो. तर एखादा पुरुष जोरात बोलला तर तो वाघ होतो. तसेच शंभर चुका करणाऱ्या पुरुषाला सुधारण्याची संधी मिळते असं म्हणत, मला अहंकार नसून मी फक्त गडाच्या पायथ्याची पायरी आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे विरुद्ध शास्त्री वाद...
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे भगवानगडावर दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना गोपीनाथ मुंडे यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी असायचा. तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली होती. पण काही दिवसांनी पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये गोपीनाथगड नावाचे स्थळ उभारण्यात आले उभारले. पुढे यावरून नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचं बोलले जाते. तर 2016 मध्ये भगवानगडाचे उत्तराधिकारी नामदेवशास्त्री यांनी गडावर यापुढे दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर दसरा मेळावा घेण्याचं जाहीर केले. त्यामुळे नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद हा जुनाच आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: