Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलनातील 36 गुन्हे मागे घेतले जाणार, पोलिसांकडून न्यायालयात प्रस्ताव दाखल
Beed : मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान एकूण 79 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे छत्तीस गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बीड (Beed) जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाला होता. 30 ऑक्टोबर रोजी बीड आणि माजलगाव मधील काही नेत्यांची घरं हॉटेल आणि कार्यालय सुद्धा जाळण्यात आली होती. या दरम्यान अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला, तर काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. आता हे किरकोळ गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलिसांनी बीड जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये प्रस्ताव दाखल केला आहे.
किरकोळ स्वरूपाचे छत्तीस गुन्हे मागे घेतले जाणार
मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान एकूण 79 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे छत्तीस गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाख रुपये पेक्षा जास्त नुकसान झालेले नाही अथवा कुणाच्याही जीवास धोका झाला नाही, असेच गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाख रुपयापेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तसेच कोणाच्या जीवास धोका निर्माण झाला, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे न घेता तपास सुरू ठेवला जाईल असं पोलीस विभागाने कळवले आहे.
जाळपोळ झाल्याच्या घटना समोर
30 ऑक्टोबर 2023 या दिवशी बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक, तसेच आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले होते. मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली होती.
मराठा समाजाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सरकारने आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, या संदर्भात कुठलाही विलंब लावू नये, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा>>>
Beed : वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी नंतर आता 'पीएफ' कडून नोटीस, कर्मचाऱ्यांचे 61 लाख रुपये थकवल्याचे प्रकरण