Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Beed News:राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयाला लातूर पोलिसांनी लावले सील. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
बीड: आज राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परळीचे पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offence Wing) पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानी मल्टीस्टेटच्या (Rajasthani Multistate) मोंढा भागातील मुख्य शाखेला सील ठोकले आहे. तसेच अरुणोदय मार्केटमधील शाखेला भेट दिली. लातूर पोलीस ठाण्यातही लातूर (Latur) येथील एका ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हे दाखल केले आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचे पोलीस परळीत येऊन गेले. दरम्यान, शनिवारी सकाळी परळी (Parli) येतील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.
परळी येथील मुख्यालय असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी परळी येथील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने आज शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. फसवणूक प्रकरणी 25 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरुन संचालक मंडळावर कारवाई करावी असा आग्रह ठेवीदारांनी धरला आहे.
मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय
केंद्र सरकारने 2020 मध्ये देशातील 1482 शासकीय आणि नागरी सहकारी बँका आणि 58 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियंत्रणाखाली आणण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आल्याने 1540 सहकारी बँकेतील खातेदारांना मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयामुळे संबंधित वित्तसंस्थांमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी वाढली होती.
बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट बँकेत 100 कोटींचा घोटाळा
गेल्यावर्षी बीड येथील जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेत 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी जिजाऊ मल्टिस्टेट बँकेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाचे प्रमुख हरिभाऊ खाडे यांनीच लाच मागितल्याची माहिती समोर आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने नुकतीच त्यांच्या घरी धाड टाकली होती. यामध्ये खाडे यांच्या घरातून आठ लाखांची रोकड, साडेनऊ तोळे सोने, पाच किलो चांदी जप्त करण्यात आली होती.
आणखी वाचा
कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई; विद्यमान ग्राहकांवर किती परिणाम होणार?