(Source: Poll of Polls)
काय सांगता! विहिरीसह अनुदान देखील चोरीला, तत्कालीन बीडीओसह पाच जणांवर गुन्हा दाखल
Beed News : या प्रकरणी केज येथील तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : आत्तापर्यंत आपण अनकेदा विहीर चोरीला गेल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. मात्र, बीड (Beed) जिल्ह्यात तर विहिरीसह (well) अनुदान देखील चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण, बनावट कागदपत्राच्या आधारावर प्रस्ताव तयार करून एका शेतकऱ्यांच्या नावावर मनरेगाच्या विहिरीचे 2 लाख 90 हजार रुपये उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी केज येथील तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, साहेबराव जाधव या शेतकऱ्यांच्या नावावर बनावट विहिरीचे कागदपत्र तयार करून जलसिंचन विहिरीचे परस्पर 2 लाख 90 हजार रुपये गटविकास अधिकाऱ्यांनी उचलले होते. त्यानंतर साहेबराव जाधव या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी साहेबराव जाधव यांना 2017 सालीच विहीर मंजूर झाली होती. मात्र, यादीमध्ये त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. पण काही दिवसांनी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकाने संगमत करून जाधव यांच्या नावाचे बनावट दस्ताऐवज तयार केले. याच दस्तऐवजाच्या मदतीने कागदोपत्री विहीर मंजूर करून 2 लाख 90 हजार रुपयाची रक्कम परस्पर उचलण्यात आली. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील शेतकरी साहेबराव सखाहरी जाधव यांची साळेगाव शिवारातील वडिलोपार्जित सर्व्हे नंबर 166 मध्ये दोन एकर जमीन आहे. त्या वडीलोपार्जीत जमीनीत पोट खराबा क्षेत्रात पूर्वीची जुनीच 40 फुट खोल विहिर आहे. सदर विहिर ही पोट खराब क्षेत्रात असल्याने त्या विहिरीची 7/12 रेकॉर्डला नोंद नाही. या विहीरीतील पाणी हे साहेबराव जाधव व त्यांचे भाऊ वापरतात. सन 2022 मध्ये मनरेगा योजने अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहिरी मंजुर झाल्या होत्या. परंतु, साहेबराव जाधव हे विहीरीसाठी पात्र असताना देखील त्यांचे नाव मंजूर यादीत नसल्याने त्यांनी चौकशी केली. यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कळविले की, त्यांच्या नावाने सन 2016-17 मध्येच विहिर मंजुर झाली होती. त्याचे 2 लाख 90 हजार रु मंजूर झालेले अनुदान वितरित झाले असल्याचे कागदपत्रे आढळून आले. त्यामुळे जाधव यांना देखील धक्का बसला. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed : घराला अचानक लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा मृत्यू, घराबाहेर पडता न आल्याने दुर्दैवी घटना