Beed Crime News: चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले? असा प्रश्न विचारत हॉटेलवर आलेल्या ग्राहकांनी हुज्जत घातली. त्यानंतर वादावदी झाली आणि प्रकरण एवढं वाढलं की, थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. पण तेवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही, हुज्जत घालणाऱ्या ग्राहकांपैकी एकानं आपल्या खिशातून पिस्तूल बाहेर काढलं आणि थेड हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर नोकरांनी हॉटेलचं शटर लावून घेतलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र या प्रकारामुळे दहशत पसरली आहे.
परळीत झालेली गोळीबाराची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. तब्बल तीन राउंड फायर झाल्यानं खळबळ उडाली आहे. सदर घटना परळी शहराजवळच्या कण्हेरवाडी शिवारात घडली. काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून आंबेजोगाईकडून परळीकडे जात असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून हा गोळीबार करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
परळीपासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे. जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवत आहेत. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चारजण चहा पिण्यासाठी आले. त्यांनी हॉटेलमधील नोकरांकडे सिगारेटचं पाकीट मागितलं. नोकरांनी पाकीटाचे पैसे सांगितल्यावर हे पाकीट महाग का दिलं? म्हणून या ठिकाणी ग्राहकांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रकरण एवढं वाढलं की, बाचाबाची आणि वादावादी सुरू झाली. त्यानंतर प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. तेवढ्यात ग्राहकांपैकी एकानं स्वतःकडील पिस्तूल काढलं आणि हवेत एक राउंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले. या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
गोळीबाराच्या घटनेनं परळी हादरली असून आसपासच्या परीसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी हॉटेलचे मालक विलास आघाव यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चौघा जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी हॉटेल चालकानं गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. तसेच, घटनेवेळी उपस्थित असलेल्या सर्व नोकरांचीही चौकशी केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :