आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
Santosh Deshmukh Murder Case : आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली

Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेचा मुख्य सुत्रधार हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निवटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जातेय. अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याच वक्तव्य केलं आहे. यानंतर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती पाहुयात.
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यांची खरी मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना म्हणाले. आरोपी ज्या लोकांच्या गाडीत बसत होते, त्या लोकांनी जर त्यांची मानसिकता तपासली असती तर अशा घटना घडल्या नसत्या असे धनंजय देशमुख म्हणाले. या आरोपींवर 40 ते 50 गंभीर गुन्हे असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
देशमुख कुटुंबीयांनी कधीही जातीवाद केला नाही. मस्साजोगला 19 पुरस्कार मिळाले आहेत. 15 वर्ष संतोष देशमुखांनी चांगले काम केल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न माझ्या भावाने केला होता असेही धनंजय देशमुख म्हणाले. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींचे पुरावे यावेळी धनंजय देशमुख यांनी नामदेव शात्री यांना देखील दिले.
गेल्या 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी माणूस होते. त्यांना चार मुले आहेत. त्यांची 3 मुलं आमची शेती करतात. एक मुलगा पुण्यात आहे. आत्तापर्यंत म्हणजे 2003 पासून त्यांनी जे पिकवलं तेच आम्ही खात आहे. संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून शेतात कामगार असणाऱ्या मुंडेचे चार किलो वजन कमी झाल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. त्याच्यासोबत म्हणजे वंजारी समाजासोबत आमची दुसरी पिढी आहे. आम्ही कधीही जातीवाद केला नसल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना भगवानगड कधीही पाठिशी घालणार नाही. भगवानगड हा कायमस्वरुपी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहिल असेही नामदेव शात्री म्हणाले.
दलित बांधवांची ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता
धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्री यांच्यासोबत बोलत आहेत. आमच्या कुटुंबीयांचा कधीच कोणता वाद झाला नाही. माझ्या भावाला अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने कॉल केला होता. या दलित बांधवांची ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता असेही धनंजय देशमुख म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले होते नामदेव शास्त्री?
धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. मुंडेंनी भगवान गडावर मुक्काम केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर नामदेव शास्त्री बोलले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की, धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. धनंजय मुंडे यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यानंतर आज देशमुख कुटुंबीयांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेत नामदेव शास्त्रींची भेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
