Onion Export Ban : कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची माहिती
Onion Export Ban: केंद्राने कांद्याची निर्यात रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, यावर कृषिमंत्री मुंडे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
बीड : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे. अशात कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुंडे म्हणाले आहेत.
केंद्राने कांद्याची निर्यात रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, कांद्याचे दर घसरले आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, "या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असून, दोन दिवसांमध्ये यावर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाईल असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा लक्ष लागले आहे.
नुकसानीबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय
दरम्यान याचवेळी बोलतांना मुंडे म्हणाले की, "दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाणारा आहे. ज्या शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा अद्यापही मिळालेला नाही, त्यांच्या खात्यावर आठ दिवसात अग्रीमची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तर, पीक काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना देखील तात्काळ पिक विमा देण्याच्या आदेश लवकरच पिक विमा कंपन्याला देण्यात येणार असल्याचे," मुंडे म्हणाले.
फडणवीसांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट...
दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. तसेच, केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन दिले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सच्या (ट्वीटर) माध्यमातून माहिती दिली आहे. तर. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "कांदा निर्यातीवर बंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल यांना भेटून सांगितल्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत विनंती केली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले असल्याचं," बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: