(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaidyanth Sakhar Kharkhana : पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात देखील छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. कारखान्याची कोणती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे याची माहिती असलेले एक पत्रक कारखान्याच्या गेटवर जीएसटी विभागाकडून लावण्यात आले आहे. त्यानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याचं हे देखील जीएसटी विभागाने म्हटलं आहे.
एप्रिल महिन्यातही छापा
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापा टाकून काही कागदपत्रे हस्तगत केली होती. जीएसटी वेळेवर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान आर्थिक देवाणघेवआर आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.
वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्थापन केला होता. या कारखान्याने कधीकाळी राज्यात सर्वाधिक ऊसाचं गाळप केल्याचं रेकॉर्ड आहे. याच कारखान्याच्या अंतर्गत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला घेतले होते. याच कारखान्यात तयार झालेली साखर कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्याला विकण्यात आली. मात्र त्याचा जीएसटी केंद्र सरकारकडे न भरल्याने जीएसटीचे अधिकारी थेट वैद्यनाथ कारखान्यात पोहोचले. जीएसटीचा नियम असा सांगतो की प्रत्येक महिन्याला जी साखर विक्री केली जाते त्याचा जीएसटी महिन्याच्या महिन्याला जमा करावा. परंतु जीएसटी भरला नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा