Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं एका महिलेचा जीव गेला आहे. विहिरीत पाय घसरुन पडल्यानं शिरुर कासारमध्ये हिंगेवाडीत ही घटना घडली.
बीड : मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं राज्यातील विविध भागात तीव्र पाणी टंचाई (Water Crisis) निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यानं देखील पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील गावांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिरुर कासार तालुक्यातील हिंगेवाडी गावातील एका महिलेचा पाणी भरायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या महिलेवर कुटुंब चालवण्याची जबाबदारी होती. मात्र, तिचाच मृत्यू झाल्यानं कुटुंब उघड्यावर आलं आहे. चंद्रकला दगडू फुलमाळी असं मृत महिलेचं नाव आहे.
कौटुंबिक जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेच्या मृत्यूने हिंगेवाडीतील फुलमाळी कुटुंब उघड्यावर आलं आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निर्मूलनार्थ प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा पायरीवरून पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना हिंगेवाडी या ठिकाणी घडली आहे.
कुटुंब उघड्यावर
चंद्रकला दगडू फुलमाळी, वय 40 वर्ष राहणार हिंगेवाडी ही महिला सकाळी पाणी आणायला गेली होती. दोन दिवसांपासून लाईट नसल्याने घरात पाणी नव्हते. यामुळे ती जवळच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन विहिरीतून वर येत असताना पायरीवरून तिचा अचानक पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली. सोबत असलेल्या चार वर्षाचा लहान मुलाने घडलेला हा प्रकार घरी येऊन सांगितला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली, महिलेला विहिरीतून बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल केले. यावेळी डॉ.पूजा मस्के यांनी चंद्रकला फुलमाळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. चंद्रकला फुलमाळी यांचा पती रुग्ण असल्याने संपूर्ण घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या महिलेच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे.
संबंधित बातम्या :
विनापरवाना प्रचार पदयात्रा, चंद्रहार पाटलांसह समर्थकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल