ऑनलाईन मागवलेल्या अंजीरच्या डब्यात निघाल्या जिवंत अळ्या, मुंग्या अन् किडे; बीडच्या वकिलाला आला धक्कादायक अनुभव
ऑनलाईन मागवलेल्या अंजीरच्या डब्यात निघाल्या जिवंत अळ्या, मुंग्या अन् किडे; बीडच्या वकीलाला धक्कादायक अनुभव

Beed: ऑनलाईन शॉपिंगमुळे घरबसल्या वस्तू मिळण्याची सोय जरी निर्माण केली असली, तरी त्याचबरोबर अनेकदा ग्राहकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणारे प्रकारही समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे घडला आहे. येथे एका वकिलांच्या कुटुंबाने ऑनलाईन मागवलेल्या ड्रायफ्रूट अंजीरच्या डब्यात जिवंत आळ्या निघाल्याचा धक्कादायक अनुभव घेतला आहे. (Beed News)
ऑनलाईन मागवलेल्या अंजिराच्या डब्यात असंख्य अळ्या, मुंग्या अन् किडे
पाटोदा येथील ऍडव्होकेट सय्यद आशरफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाने 23 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉनवरून अंजीरचा एक डबा मागवला होता. यासाठी 464 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यात आले होते. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी हा पॅक त्यांच्या घरी वितरित झाला. नेहमीप्रमाणे त्यांनी पॅक उघडून पाहिला असता, आत काही हालचाल दिसल्याने ते चकित झाले. बारकाईने पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, अंजीरच्या तुकड्यांमध्ये जिवंत आळ्या फिरत होत्या.
कस्टमर केअरकडून केवळ दिलगिरी!
हा प्रकार पाहून सय्यद कुटुंब अक्षरशः हादरून गेले. आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याने त्यांनी तत्काळ ॲमेझॉनच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून फक्त “दिलगिरी व्यक्त” करण्यात आली आणि पुढील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप ऍडव्होकेट सय्यद यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, “ ॲमेझॉनवरून आम्ही अंजीर मागवले होते. नेहमीप्रमाणे आलेलं पार्सल उघडून पाहिलं असता त्यात किडे, मुंग्या आणि आल्या वळवळताना दिसल्या. ऑनलाईन कंपन्यांनी ग्राहकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी पार पाडायला हवी. मात्र, अशा निष्काळजीपणामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय. याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.”नागरिकांनीही ऑनलाईन फूड प्रॉडक्ट्स मागवताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, ऍडव्होकेट सय्यद आशरफ यांनी फूड सेफ्टी विभाग आणि ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी संबंधित ड्रायफ्रूटचा पॅक आणि त्यातील व्हिडिओ पुरावे सुरक्षित ठेवले आहेत.
हेही वाचा






















