बीड हादरलं! आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; तीनही आरोपी अल्पवयीन
Beed Crime News : एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड: जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अमानुषपणे अत्याचार (Rape) केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या तीनही मुलांना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षे वय असलेल्या तिघा मित्रांनी एका आठवर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरात ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आरडाओरडा ऐकून रस्त्यावरुन जाणारा व्यक्ती मदतीला आला...
बीड शहरातील एका भागातील रहिवासी असलेली आठ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या कुटुंबीयान सोबत राहते. तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पिडीत मुलगी घराजवळ खेळत होती. याचवेळी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका पडक्या घरामध्ये घेऊन गेले. त्यानंतर या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. याचवेळी पीडितेने केलेला आरडाओरडा ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. तसेच अल्पवयीन मुलांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली.
पालकांना नोटीस...
मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच, या प्रकरणी रविवारी रात्री अकरा वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीनही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली असून, या बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, गरजेनुसार तपासासाठी त्यांना हजर करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वयाची खात्री करण्यासाठी शाळेचा प्रवेश निर्गम पाहून त्यांचे वय ठरवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; आरोपीच्या अटकेसाठी पैठणमध्ये मोर्चा