Beed Airport: बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, नेमकं कुठे असणार एअरपोर्ट?
विमानतळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांशी थेट हवाई मार्गाने होणार आहे.

Beed: बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरू झाल्यानंतर आता बीडमध्ये विमानही लँड होणार आहे. यासाठी प्रशासनाने कामखेडा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली आहे. (Beed Airport) एअरपोर्ट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा परिसराची पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून असा निष्कर्ष काढण्यात आला की, बीड जवळील कामखेडा परिसर विमानतळ प्रकल्पासाठी सर्वात योग्य ठरेल.
Beed Airport: विमान सेवेसाठी किती जमीन लागणार?
अधिकार्यांच्या मते, या ठिकाणी राज्य सरकारकडे दोनशे एकर पेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. जमिनीचा उतार, भौगोलिक परिस्थिती आणि परिसराची सुसंगतता हे सर्व विमानतळ उभारणीस पोषक आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 170 हेक्टर जमीन लागणार आहे, ज्यापैकी 80 हेक्टर जमीन सरकारकडे उपलब्ध आहे. उर्वरित जमीन भूसंपादनाद्वारे मिळवावी लागणार आहे.
आता प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया, प्रकल्पाची डिझाईनिंग आणि बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. बीड विमानतळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील नव्या विमानतळांपैकी महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, असे अधिकारी सांगतात. या प्रकल्पामुळे बीडच्या लोकांसाठी सुविधा, रोजगार आणि आर्थिक प्रगती याची नवी दालनं उघडणार आहेत, ज्यामुळे शहराचे महत्त्व देशाच्या हवाई नकाशावर वाढेल.
बीड मोठ्या शहरांशी जोडलं जाणार
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी देखील कामखेडा परिसराचे दौरे करून विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा आणि पायाभूत रचनेवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी विमानतळ उभारणीसाठी लागणारी रणनीती, सुरक्षा निकष आणि पर्यावरणीय बाबींचा तपास केला. विमानतळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांशी थेट हवाई मार्गाने होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी वेळ वाचणार, तसेच पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत करण्येयात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये रेल्वे धावली. मराठावाड्यातील बीड (beed) जिल्हा या रेल्वेमार्गापासून वंचित होता. त्यामुळे, गेल्या तीन पिढ्यांपासून बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं, रेल्वेची शिट्टी वाजावी, रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं. अखेर, हे स्वप्न सत्यात उतरलंआहे. आता एसटी, रेल्वेसह विमानसेवाही सुरु होणार असल्यानं आनंद व्यक्त होत आहे.


















