Beed News : लोकं झोपल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजता उरकला बालविवाह; बीडमधील प्रकार
Beed News : याबाबत तक्रार करण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed News : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात (Beed District) बालविवाहाचे (Child Marriage) प्रमाण वाढले आहेत. तर प्रशासनाकडून देखील जनजागृती करून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र असे असताना नागरिक वेगवेगळ्या शक्कल लढवून बालविवाह उरकत आहेत. आता असाच काही प्रकार बीड तालुक्यातील खंडाळा येथे समोर आला आहे. लोकांना बालविवाह होत असल्याची माहिती मिळू नये म्हणून चक्क मध्यरात्री अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत तक्रार करण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वय 14 वर्षे असल्याने कोणी विवाह होऊ देणार नाही. त्यामुळे सर्व लोक झोपल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजता विवाह लावण्यात आला. परंतु याची तक्रार दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने पुढाकार घेत महिन्यानंतर 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बीड तालुक्यातील खंडाळा येथे 21 मे रोजी घडला होता. तर 23 जून रोजी या प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील 14 वर्षिय मुलीचा विवाह बीड तालुक्यातील खंडाळा येथील 24 वर्षीय मुलासोबत ठरवण्यात आला होता. परंतु याला घरातीलच काही लोकांचा विरोध होता. त्यामुळे मुलीकडील लोकांनी मुलीला खंडाळा येथे आणत 21 मे रोजी रात्री साडेबारा वाजता विवाह उरकला. सकाळी उठल्यावर याची कोणालाही खबर लागू दिली नाही. परंतु काही दिवसां याची माहिती 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्रशासनाला मिळाली. खंडाळ्याचे ग्रामसेवक भूषण योगे, सामाजिक कार्यकर्ते तत्वशी कांबळे आणि इतरांनी लगेच गावत जावून खात्री केली. मात्र दोन्हीकडील नातेवाइकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सर्व माहिती घेऊन खात्री पटल्यानंतर योगे यांच्या फिर्यादीवरून 14 जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साखरपुड्याच्या नावावर गुपचूप लग्न...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याचे समोर येत आहे. या अनुषंगाने प्रशासन सक्रिय झाले असून, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. पण आता बालविवाह करणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवल्याचे समोर येत आहे. लग्न रोखण्यास गेलेल्या पथकास, साखरपुडा सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, अनेकांना आमंत्रण देतांना देखील साखरपुडा असल्याचेच आमंत्रण दिले जाते. मात्र प्रत्यक्षात गुपचूप लग्न उरकले जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Parbhani News : गुन्हे नोंदवतात म्हणून परभणीतील बालविवाह दुसऱ्या जिल्ह्यात लावण्याचा धडाका