बोगस बियाण्यांचे रॅकेट, साठेबाजी,नफेखोरीवर तात्काळ कारवाई करा; कृषिमंत्र्यांचे कृषी आयुक्तांना निर्देश
Abdul Sattar : राज्यात बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन कारवाईचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली होती.
बीड: खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची राज्यभरात होत असलेली विक्री, लोकप्रिय बियाण्यांची आणि खतांची साठेबाजी तसेच दुकानदारांकडून सुरू असलेली नफेखोरी यावर आळा घालण्याबाबत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar Latest News) यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत असून यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापसाच्या कबड्डी तसेच सोयाबीनच्या महाबीज 71 यासारख्या लोकप्रिय बियाण्यांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करतात. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना गुरुवारी पत्राद्वारे केली होती.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडक कारवाया आणि धाडसत्रे राबवण्यात यावेत, यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत यासह विविध उपाययोजना करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ दखल घेतली आहे.
धनंजय मुंडे यांनी निवेदनात केलेल्या मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता खत आणि बियाण्यांची विक्री सुरळीत होईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे परंतु शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
वर्ध्यात पशुवैद्यकीय डॉक्टर करायचा शेतकऱ्यांची फसवणूक
वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील एका स्लॅबच्या इमारतीत सुरु असलेला बोगस बियाणे विक्री कारखाना उद्ध्वस्त करत बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन 8 आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहचलीय. कोमल कांबळे रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर याला अटक करुन त्याच्या कृषी सेवा केंद्रातून बोगस कपाशी बियाण्यांची 74 पाकिटं पोलिसांनी जप्त केलीय. तर यवतमाळ जिल्ह्यातून मेहमूद गफ्फार चौहान याला अटक करण्यात आलीय.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापूर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरला अटक केलीय. विजय अरुण बोरकर असं आरोपी डॉक्टरच नाव आहे. हा जनावरांचा डॉक्टर असून गावागावांत जनावरांवर उपचार करण्यासाठी जाताना बोगस बियाण्यांची पाकिटं घेऊन जातं त्याची शेतकऱ्यांना विक्री करीत होता.पोलिसांनी अटक करताच या डॉक्टरने बियाणे विक्री केल्याची कबुली दिलीय. प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपीना अटक करत न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने आरोपीना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय.
बोगस बियाणे प्रकरणातील आरोपीच्या घरात आढळली 28 लाखाची रोकड
वर्ध्याच्या म्हसाळा येथे सापडलेल्या बोगस कपाशी बियाणे रॅकेट मधील आरोपीच्या घरी मोठी रोकड सापडली आहे. सेलू तालुक्याच्या रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून पोलिसांना 28 लाख 20 हजार रुपयाची रक्कम मिळाली आहे. बोगस बियाणे विक्रीतून ही रक्कम आली असल्याची माहिती आहे. प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता आहे. आतापर्यत अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.