मुंबईकरांसाठी खुशखबर! आता इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगची चिंता विसरा, 500 ठिकाणी सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन
Mumbai Electric Two Wheeler Battery Swapping Station: भारतात इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मात्र अजूनही यामध्ये असा एक मोठा ग्राहक वर्ग आहे, जो इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंग समस्यांमुळे हे वाहन खरेदी करण्यास घाबरतो.
Mumbai Electric Two Wheeler Battery Swapping Station: भारतात इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मात्र अजूनही यामध्ये असा एक मोठा ग्राहक वर्ग आहे, जो इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंग समस्यांमुळे हे वाहन खरेदी करण्यास घाबरतो. तसेच यामध्ये असेही ग्राहक आहे, ज्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली आहे. पण चार्जिंगवर अवलंबून राहावं लागत असल्याने ते त्याचा कमी वापर करतात. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण लवकरच मुंबईत 500 ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरु होणार आहे. जिथे ग्राहक आपल्या दुचाकीची डिस्चार्ज झालेली बॅटरी बदलून चार्ज असलेली बॅटरी आपल्या दुचाकीत वापरू शकतात. यात ग्राहकांचा वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. तसेच याने इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्रोत्साहन देखील मिळणार आहे.
मुंबईत बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यासाठी ‘व्होल्टअप’ने आज अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो यांच्याशी भागीदारी जाहीर केली आहे. भारतात पहिल्यांदाच बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अपने स्मार्ट मोबिलिटीला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, ओईएम आणि अंतिम पायरीपर्यंत सेवा देणाऱ्या भागीदारांच्या बरोबरीने कामाला सुरुवात केली आहे. गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान 10 ठिकाणी 120 कठड्यांसह (डॉक्स) सुरू होणारी, ही भागीदारी चर्चगेट ते मीरा-भाईंदर या पश्चिम मार्गावर वर्षाअखेरीस आणखी 50 स्थानांची भर घालणार आहे. बॅटरी स्वॅपिंगच्या सुविधेत सहज प्रवेश मिळावा यासाठी संपूर्ण शहरात स्मार्ट इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टेशन्स उभारण्याचा प्रयत्न म्हणून या भागीदारीद्वारे 2024 पर्यंत मुंबईभर अशा 500 बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरु करण्याचा विचार आहे. ज्यायोगे दररोज 30,000 हून अधिक दुचाकीस्वारांना सेवा पुरविली जाईल.
चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव, तशा सुविधा बाळगण्याची अधिक किंमत आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारा अधिकच चार्जिंग वेळ हे भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्याच्या दिशेने प्रमुख अडथळे आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी व्होल्टअप, अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि त्याच्या विस्ताराच्या दिशेने एकत्र आले असल्याचे सांगण्यात येत आहे. व्होल्टअप हे अनेक प्रसंगी दुचाकीची बॅटरी चार्ज करणे आव्हानात्मक असणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी रायडर्सना त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास सक्षम असेल. झटपट बॅटरी अदलाबदल केल्याने डिलिव्हरी रायडर्सना मदत होणार आहे. तसेच यामुळे खर्चही 3 रुपये प्रति किमीवरून कमी होऊन 1 रुपया प्रति किमी होईल.
कोणत्या दुचाकीला मिळेल याचा फायदा
प्रत्येक इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी वेगळ्या आकारची असते. यामध्ये काही इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये बॅटरी फिक्स करण्यात आली आहे, जी काढली जाऊ शकत नाही. ज्यांना याचा फायदा होणार नाही. मात्र ज्या इलेक्ट्रिक दुचाकींची बॅटरी काढून बदल करण्यायोग्य आहे, त्यांना याचा फायदा कसा होऊ शकतो? याबाबत व्होल्टअप कंपनीच्या प्रतिनिधींना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, कंपनीने सध्या हिरो मोटर्स इलेक्ट्रिकशी हातमिळवणी केली आहे. भविष्यत स्वॅपिंग स्टेशनमध्ये उपलब्ध होतील अशा प्रकारची बॅटरी आपल्या आगामी इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बसवण्यास कंपनी सांगणार आहे. तसेच कंपनी इतर दुचाकी उत्पादकांशीही भागीदारीसाठी चर्चा करत आहे. तसे झाल्यास त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही तशाच प्रकारची बॅटरी लावण्यात यावी, असा कंपनी आग्रह करणार आहे. जेणेकरून व्होल्टअप कंपनीशी संबंधित दुचाकी उत्पादकांना आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीत बॅटरी स्वॅपिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही.