Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या गाड्यांची रेल्वेतून वाहतूक, तब्बल 17.4 कोटी लिटर तेलाची बचत
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने 2021-22 या आर्थिक वर्षात रेल्वेच्या माध्यमातून 2.33 लाख कारची वाहतूक केली आहे. त्यामुळे 17.4 कोटी लिटर तेलाची बचत झाली आहे.
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने गेल्या 8 वर्षांत भारतीय रेल्वेतून सुमारे 11 लाख वाहनांची वाहतूक केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे 1,56,000 ट्रकच्या फेऱ्यांची बचत झाली आहे. याबरोबरच 17.4 कोटी लिटर तेलाची बचत देखील झाली आहे.
मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वाहतुकीचा विक्रम केला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेच्या माध्यमातून 2.33 लाख कारची वाहतूक केली आहे. मारुती सुझुकी ही देशातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी आहे, जीने 2013 ला देशाच्या अनेक भागांत रेल्वेद्वारे कार पाठवण्यास सुरुवात केली. या आठ वर्षांत कंपनीने आतापर्यंत 11 लाख वाहनांची रेल्वेद्वारे वाहतूक केली आहे.
17.4 कोटी लिटर तेलाची बचत
गेल्या आर्थिक वर्षात वाहतुकीमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वेमार्गे कार पाठवल्याने कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 4,800 मेट्रिक टनांनी कमी होण्यास मदत झाली आहे. या निर्णयामुळे ट्रकच्या सुमारे 1.56 लाख फेऱ्याही कमी झाल्या आहेत. एवढेच नाही तर 17.4 कोटी लिटर तेलाची बचत झाली आहे. मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक राहुल भारती म्हणाले की, रेल्वेमार्गे कार पाठवल्याने कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे. यासोबतच रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून देखील सुटका झाली आहे.
पुढे बोलताना भारती म्हणाले, "कंपनी रेल्वेमार्गे पाठवल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. मारुती सुझुकीने 2014-15 मध्ये रेल्वेद्वारे 66,000 कारचा पुरवठा केला होता, जो 2021-22 मध्ये वाढून 2.33 लाख युनिट्स झाला. सध्या कंपनी देशाच्या अनेक भागांत पाठवल्या जाणाऱ्या वाहनांपैकी 15 टक्के वाहने रेल्वेमार्गे पाठवते. हे प्रमाण आणखी वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे."
2013 मध्ये ऑटोमोबाईल फ्रेट ट्रेन ऑपरेटर (AFTO) परवाना मिळवणारी मारुती सुझुकी ही देशातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी होती. या परवान्याद्वारे कंपनीला रेल्वे नेटवर्कवर हाय-स्पीड, उच्च-क्षमतेचे ऑटो-वॅगन रेक चालविण्यास मान्यता मिळाली. कंपनीकडे 41 रेल्वे रेक आहेत. प्रत्येक रेकची क्षमता 300 वाहनांची आहे.