Hydrogen Car : जगप्रसिद्ध कंपनी Ferrari Hydrogen Car लॉन्च करण्याच्या तयारीत, पेट्रोल इंजिनलाही देणार टक्कर
Ferrari's Hydrogen Car : Ferrari Motors Company पर्यायी ऊर्जेशी संबंधित अशा तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, जे सध्या उपलब्ध असलेल्या कारप्रमाणेच परफॉर्मन्स देईल.
Ferrari's Hydrogen Car : लग्झरी कार निर्माता कंपनी फेरारीनं हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. रिपोर्टनुसार, इटालियन सुपर कार निर्माती कंपनी फेरारी हायड्रोजन सेलपासून विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे तंत्रज्ञान आधीपासूनच वापरलं जात असलं तरी, ऑटोमोबाईल उद्योगाच्या क्षेत्रात क्वचितच वापरात असल्याची माहिती आहे. हे शून्य कार्बन उत्सर्जन (Zero Carbon Emissions) तंत्रज्ञान असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर गाड्यांमध्ये करणं हा पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो.
Reuters च्या अहवालात दावा केल्याप्रमाणे, फेरारीने आपलं लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर केंद्रित करण्यासाठी इटलीतील मॅरानेलो येथील त्याच्या प्लांटमध्ये नवीन उत्पादन युनिट उघडलं आहे. कंपनीचं उत्पादन 35 टक्क्यांनी वाढवून 2025 पर्यंत वार्षिक 15000 युनिट्सचे उद्दिष्ट साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. 2021 मध्ये कंपनीनं 11155 कार्सचं उत्पादन केलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी कंपनीला दररोज सुमारे 65 कार्सचं उत्पादन वाढवावं लागणार आहे.
पेट्रोल इंजिनलाही टक्कर देणार Hydrogen Car
फेरारी मोटर्स कंपनी सध्या गाड्यांमध्ये विविध प्रयोग करताना दिसतेय. सध्या कंपनी गाड्यांसाठी इंधना व्यतिरिक्त इतर काही पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यातीलच एक पर्याय म्हणजे, हायड्रोजन.
फेरारी मोटर्स कंपनी पर्यायी ऊर्जेशी संबंधित अशा तंत्रज्ञानामध्ये प्रयोग करत आहे, जे सध्या उपलब्ध असलेल्या कारप्रमाणेच परफॉर्मन्स देईल. नुकत्याच झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत, फेरारी 2025 पर्यंत बाजारपेठेत पूर्ण इलेक्ट्रिक कारसह नव्या भविष्यासह दमदार एन्ट्री घेणार आहे. दरम्यान, सध्या कंपनी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही लक्ष केंद्रीत करणार आहे. या ऑटोमोबाईल कंपनीनं अद्याप आपल्या इलेक्ट्रिक कार्सच्या भविष्याबाबत, योजनांबद्दल उघडपणे काहीही सांगितलेलं नाही.
हायड्रोजनवर चालणारी कार कधी येणार?
फेरारीचे सीईओ बेनेडेटो विग्ना (Benedetto Vigna) यांनी सूचित केलं आहे की, कंपनी युरोप आणि आशियातील आपल्या चार भागीदारांसह हायड्रोजन बॅटरीवर काम करत आहे. ज्यामुळे येत्या काळात बॅटरीची गुणवत्ता सुधारली जाईल. तसेच, यामुळे बॅटरी आणखी हलकी आणि अधिक सक्षण होण्यासाठी मदत होईल. परंतु ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि हायड्रोजन सेलसह पॉवर कार बाजारात आणण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. यासाठी कमीत कमी 2030 पर्यंतचा कालावधी लागू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.