डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा सरस, विक्रीत झाली विक्रमी वाढ
Electric Auto Rickshaw: कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीत असलेल्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुन्हा तेजी आली आहे.
Electric Auto Rickshaw: कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीत असलेल्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुन्हा तेजी आली आहे. आता बाजारात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबतच बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातील विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, तीन चाकी सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांनी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना मागे टाकले आहे. मे 2022 मध्ये इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सेगमेंटने 21,911 युनिट्स विकल्या, तर इंधनावर चालणाऱ्या तीन चाकी वाहनांची 19,597 युनिट्स विकल्या गेल्या. इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरचा बाजारहिस्सा 45 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
इलेक्ट्रिक थ्री व्हीलरच्या विक्रीत अचानक वाढ होण्याचे कारण गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या किमतीत झालेली वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, सरकार अशा अनेक योजना चालवत आहे, ज्या लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत. जर डेटा पाहिला तर मे 2022 मध्ये विकल्या गेलेल्या तीन चाकी वाहनांपैकी 47 टक्के इलेक्ट्रिक, 27 टक्के सीएनजी आणि उर्वरित पेट्रोल आणि डिझेल वाहने होती.
एका अहवालानुसार, इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे डिझेल ऑटो चालविण्याचा खर्च आता वार्षिक 40,000 ते 50,000 पर्यंत वाढला आहे. शिवाय वाहनांच्या किमतीत वाढ झाल्याने ईएमआय आता 6-7 टक्क्यांनी महाग झाला आहे. ई-कॉमर्स, फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, कार्गो, कचरा व्यवस्थापन आणि फ्रेट लोडर्समुळे इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय चालवण्याचा खर्च कमी असल्याने प्रवासी तीन चाकी खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांचा कलही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक थ्री व्हीलरची मागणी पाहून अनेक वाहन निर्मात्यांनी या शर्यतीत उडी घेतली आहे. तर आधीच प्रस्थापित कंपन्या आता त्यांची वाहने इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये बाजारात सादर करत आहेत दरम्यान, भारतीय बाजारपेठेतील प्रमुख इलेक्ट्रिक थ्री व्हीलरमध्ये ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM), पियाजिओ इलेक्ट्रिक आणि महिंद्रा इलेक्ट्रिक यांचा समावेश आहे. जे बाजारात विविध प्रकारचे मालवाहू आणि प्रवासी वाहनांची विक्री करतात.