औरंगाबादमध्ये दोन कैद्यांचा मृत्यू, हर्सूल कारागृहात भोगत होते शिक्षा
हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांचा आज मृत्यू झाला आहे. कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर दुसऱ्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
औरंगाबाद : कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासह अन्य एका कैद्याचा आज मृत्यू झाला आहे. कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर दुसऱ्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
हर्सूल कारागृहात हाब्या पानमळ्या भोसले (कैदी क्रमांक सी-6544 ) हा मोक्का न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याला कारागृहातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. तर, रमेश नागोराव चक्रुपे (वय 60, कैदी क्रमांक सी- 8572) हा आरोपी घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 10 मध्ये उपचार घेत होता. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील कोठेवाडी येथील एका घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात घरातील सर्व लोकांना जबर मारहाण केली होती. शिवाय चार महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्वच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणातील आरोपी हाब्या पानमळ्या भोसले हा औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते कोठेवाडी प्रकरण
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कोठेवाडी प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहून न्यायालयाने त्यांना सक्तमजुरीसह प्रत्येकी दहा लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 13 जणांनी कोठेवाडीत दरोडा टाकला होता. न्यायालयाने या सर्वांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
महत्वाच्या बातम्या