Aurangabad : तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांच्याकडून औरंगजेबच्या कबरीचं दर्शन, शिवसेनेची टीका
Akbaruddin Owaisi : औवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यांतर त्यावर शिवसेनेने टीका केली आहे.
औरंगाबाद: एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते. औवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर आता यावरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने औवेसींच्या या कृत्यावर टीका केली आहे.
खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "औरंगजेबने इथल्या नागरिकांवर जिझिया कर लावला. हिंदू मंदिरं पाडली, लोकांना त्रास दिला. हिंदू धर्म नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न केला. खुल्ताबादमधील इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण त्या ठिकाणच्या औरंगजेबच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. आज एमआयएम वाल्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अकबरुद्दीन औवेसी हे आज एका शाळेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी आज आम्ही सर्व दर्ग्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही.एका कबरीचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचं दर्शन घेतलं.
औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.