Chandrakant Khaire : समांतर जलवाहिनी भाजपनेच बंद पाडली, फडणवीसांनी शहरात यायची गरज नव्हती : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविरोधात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर खैरे यांनी टीका केली
Chandrakant Khaire : संभाजीनगर हा बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. समांतर जलवाहिनी भाजपनेच बंद पाडली. आता या प्रकल्पाची रक्कम वाढली असून हे पाप भाजपचं असल्याची टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी या शहरात यायची काही आवश्यकता नव्हती. पाच हजारापेक्षा जास्त लोक या मोर्चात नव्हते असेही खैरे म्हणाले. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविरोधात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर खैरे यांनी टीका केली.
राज ठाकरेंना नामकरणाची प्रोसिजर माहिती आहे का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील यावेळी चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांना राज ठाकरेंना नामकरणाची प्रोसिजर तरी माहिती आहे का? असा टोला खरैंनी राज ठाकरेंना लगावला. औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना खैरे यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
राज्यसभेबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य
सध्या राज्यसभेची निवडणूक लागली आहे. शिवसेनेकडून दोन जणांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावर खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना खैरे म्हणाले की,राज्यसभेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल असे खैरे म्हणाले. संभाजीराजे यांनी शिवसेनेत यायला नकार दिल्याची माहिती मिळत आहे, उद्धव साहेब यातून मार्ग काढतील, असेही खैरे यावेळी म्हणाले.
आठ जूनला मुख्यमंत्री औरंगाबादला येणार
येत्या आठ जूनला शिवसेनेचा मराठवाड्यातल्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये येणार आहेत. यावेळी ते सगळ्यांचा समाचार घेतील असेही खैरे म्हणाले.
माझ्या मित्र नितीन गडकरी यांचे मला दुःख आहे. कारण, नॅशनल हायवे 211 मधल्या टनेलचे भूमिपूजन झालं आहे, पण ते आता म्हणतात पैसे नाहीत. सगळ्यांनी पत्र देऊनही गडकरी हे काम करत नाहीत. याबाबत काय राजकारण आहे मला माहिती नाही असेही खैरे यावेळी म्हणाले.