(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Political war: 'फडणवीसांच्या 'जल आक्रोश मोर्च्या'त महिलांना पैसे देऊन आणलं'; दानवेंनी केला व्हिडीओ पोस्ट
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविरोधात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्च्यात पैसे देऊन गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. तर यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा फेसबुकवर पोस्ट केला आहे.
यावर बोलताना दानवे म्हणाले की, भाजपकडून काढण्यात आलेला मोर्चा शहरासाठी होता, पण यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलवण्यात आले. एवढच नाही तर पैसे देऊन लोकं मोर्च्यात आणली गेली होती. कारण शहरातील लोकांचा या मोर्चाला पाठिंबा नव्हता आणि भाजप खोटं बोलत असल्याचा त्यांना माहित असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून ज्यात महिलांना पैसे देऊन मोर्च्यासाठी बोलवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल!
सोमवारी औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्यावेळी फडणवीस यांनी पाणी प्रश्नावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 25 वर्षाच्या काळात शिवसेनेने औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश केला. महापालिकेकडे एकही पैसा उरला नाही. आता जे काही चाललंय ते केवळ केंद्र सरकारच्या पैशावर सुरू आहे. महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. औरंगाबादमध्ये जे काही झालं ते आमच्या काळात झालं. आताचं सरकार हे पाण्याचं शत्रू असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
राज ठाकरे-फडणवीसांनंतर उद्धव ठाकरेंची सभा...
औरंगाबाद शहर सद्या राजकीय नेत्यांच्या सभा आणि मोर्च्यामुळे चर्चेत आला आहे. आधी राज ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली ज्याची मोठी चर्चा झाली. त्यांनतर सोमवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणातून महविकास आघाडी सरकारसोबतच शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहे. त्यामुळे या सभेत आता त्यांच्यावर निशाणावर कोण-कोण असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.