Sameer Wankhede vs Nawab Malik : ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंच्या आत्यांची एन्ट्री; औरंगाबादमध्ये तक्रार
Sameer Wankhede vs Nawab Malik : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंच्या आत्यांची एन्ट्री झाली असून आता हे प्रकरण थेट औरंगाबादपर्यंत पोहोचलं आहे.
Sameer Wankhede vs Nawab Malik : एनसीबीचे (NCB) झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सातत्यानं समाजात आणि नातेवाईकांत बदनामी करत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांच्या आत्यानं तक्रार केली आहे.
गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाईकांची पूर्ण वंशावळ आणि जातीचे दाखलेही सोबत जोडले आहेत. मंत्री असतानाही मलिक मुस्लीम म्हणून हिणवत आहेत. वानखेडे कुटुंबिय नवबौद्ध नसून ते मुस्लीमच आहेत, असं म्हणून सतत परिवाराची बदनामी सुरु केली आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. जातियवादी वक्तव्य केल्यामुळं नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
समीर वानखेडे यांच्या आत्यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, आमचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड कोपा असून आम्हाला सर्वजण नवबौद्ध जातीचे म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे सन्मान देतात. नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण विशेषतः समीर वानखेडे आणि त्याचे वडिल मुंबई परिसरात राहिलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी खोटी माहिती पुरवून वारंवार आरोप केले आहेत. या आरोपांमुळे माझी आणि कुटुंबियांची मनस्थिती खूप बिघडी आहे. आम्ही मानसिक तणावात शेवटचा उपाय म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत.
नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंचे वडील कोर्टात, 1.25 कोटींचा मानहानीचा दावा
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे, जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा हा होय. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. आज, सोमवारी याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिकांना ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं नबाव मलिक यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवाब मलिक सोशल मीडियावर धडाधड उत्तर देत आहेत, तर अपेक्षा आहे की इथंही ते पटापट उत्तर देतील असा टोला लगावत नवाब मलिकांना मंगळवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.