PFI : पीएफआयच्या फरार कार्यकर्त्याला औरंगाबादमध्ये अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
PFI Controversy : ज्या दिवशी पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती त्या वेळी हा कार्यकर्ता फरार झाला होता.
मुंबई : महाराष्ट्र एटीएसने पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या एका फरार कार्यकर्त्याला औरंगाबादवरून अटक केली आहे. एटीएसने ज्या दिवशी पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती त्या दिवशी हा कार्यकर्ता फरार झाला होता. मोहम्मद अबेद अली असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एटीएसच्या पथकाने गेल्या आठवड्यात पीएफआयच्या सुमारे 20 सदस्यांना अटक केली आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 121(A), 153(A), 109, 120(B) तसेच 13(1)(B) अनलॉफूल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
काय आहे प्रकरण?
चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. त्यानंतर पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पुणे पोलिसांनी 41 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सर्व म्हणजे 41 जणांना जामीन मिळाला . पण नंतर या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावर पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर नवीन गुन्हे दाखल केले.
दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि कट रचणे असे आरोप ठेवत पुणे पोलिसांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पीएफआयची रणनीती
सन 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी पीएफआयची रणनीती समोर आली आहे. सुशिक्षित आणि श्रीमंत मुस्लिम पीएफआयच्या बाजूनं उभे राहणार नाहीत असं या संघटनेला वाटतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिम आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या हिंदूवर पीएफआयनं लक्ष केंद्रीत केलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तचर अहवालात असा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल सगळ्या यंत्रणांना पाठवण्यात आला असून त्यानंतरच सरकारनं केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं ऑपरेशन ऑक्टोपस सुरु केलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- PFI Controversy: 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती
- PFI Controversy : पुरावे असून बंदी का नाही? PFI चा फायदा भाजपालाच; काँग्रेसचे टीकास्त्र