PFI Controversy : पुरावे असून बंदी का नाही? PFI चा फायदा भाजपालाच; काँग्रेसचे टीकास्त्र
PFI Controversy : पुरावे असून पीएफआयवर बंदी का घातली नाही असा सवाल करत भाजपलाच त्यांचा फायदा होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
PFI Controversy : पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी (PFI Pune Protest) केलेल्या घोषणाबाजीच्या मुद्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी पीएफआयविरोधात पुरावे असल्याचे जाहीर केल्यानंतरही पीएफआयवर भाजपने (BJP) बंदी का घातली नाही, असा सवाल काँग्रेसने (Congress) केला आहे. कोरोना काळात पुणे महापालिकेने पीएफआयला दफनविधीची जबाबदारी का केली असा प्रश्नही काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात छापेमारी केली. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी होती. या आंदोलनादरम्यान पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देण्यात आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता या कथित घोषणाबाजीनंतर राजकारण पेटू लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू , असे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ रिट्वीट करत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजपला प्रतिप्रश्न केला आहे. PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? असा सवाल करत भाजपालाच PFI चा फायदा होतो असाही आरोप केला आहे.
PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो https://t.co/kF5YtR5Bsb
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2022
आंदोलनाला पोलिसांनी नाकारली होती परवानगी
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पीएफआयच्या कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. जक्या चार लोकांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, अशा सूचना पोलिसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र जमावाने या सूचनांचं पालन न करता मोठ्याने घोषणाबाजीला सुरुवात केली. खाली बसून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्नदेखील केला. जमावाकडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी लगेच कारवाई करायला सुरुवात केली होती. हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी एनआयए मुर्दाबाद, भाजप मुर्दाबादच्या घोषणांसह कथितपणे पाकिस्तान झिंदाबादच्याही घोषणा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'ची घोषणा दिल्याचा उल्लेख नाही. मात्र, इतर घोषणांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: