G-20: विदेशी पाहुण्यांच्या आगमनास सुरुवात; विदेशी महिलांना साडी नेसविणे, बांगड्या भरण्यासाठी खास पथक
Chhatrapati Sambhajinagar: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते चिकलठाणा विमानतळावर विदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar: जी-20 परिषदेचं (G20 Conference) बहुमान यंदा भारताला मिळाला असून, अनेक देशातील विदेशी पाहुणे यानिमित्ताने देशातील वेगवेगळ्या शहरात बैठका घेत आहे. दरम्यान 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी जी-20 शिखर परिषदेच्या वूमन-20 ची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, शनिवार पासून विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या बैठकीस देश-विदेशांतील महिला बालकल्याण आणि उद्योग, व्यापार क्षेत्रातील 125 प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी चार देशांच्या पाहुण्यांचे शहरात आगमनदेखील झाले असून, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
जी-20 शिखर परिषदेच्या वूमन- 20 या परिषदेचे उद्घाटन 27 फेब्रुवारीला सकाळी 0930 वाजता हॉटेल रामामधील सीता हॉल येथे होणार आहे. उद्घाटन सत्रात केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, परिषदेच्या डॉ. संध्या पुरेचा, डॉ. गुल्डीन तुकतेन अमिताभ कांत, धारित्री पटनायक या आपले विचार व्यक्त करतील. दिवसभरात चार सत्रांमध्ये महिलांच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान पाहुणे छत्रपती संभाजीनगर लेणी आणि बिबी का मकबरा येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर 10.30 ते 3 या वेळेत पुन्हा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. दुपारी तीन वाजता वेरूळ लेणीकडे प्रयाण करणार आहेत. लेणी पाहिल्यानंतर 7 वाजता वेरूळ येथील अभ्यागत केंद्रात गाला डिनर आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
साडी नेसविणे, बांगड्या भरण्यासाठी खास पथक
साडी, टिकली, मेहंदी, बांगड्या, पैंजण अशा अनेक वस्तू भारतीय महिला साजशृंगारात वापरतात. जगभरातील महिलांसाठी या वस्तूंचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. दरम्यान जी-20 परिषदेनिमित्त येणाऱ्या जगभरातील विविध देशांतील महिलांनाही साडी नेसविणे, बांगड्या भरणे, मेंदी काढून देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे केले जात आहे. भारतीय पोशाख (साडी), बांगड्या, मेहंदी आदींचा साज चढवून, विदेशी महिलांची नटण्या-मुरडण्याची हौसही भागविण्याची तयारी याद्वारे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी खास पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या देशतील पाहुणे आले!
जी-20 निमित्त शहरात 125 पाहुणे येणार असून, जवळपास 50 विदेशी पाहुणे असतील. यापैकी अमेरिकेच्या केल्सी हॅरीस, दक्षिण अफ्रिकेच्या नारनीया बोहल्हेर, सिबुलेले पोसवायो तर तुर्कीच्या सेवीम काया, सारे ओझटुर्क, फातमा उसीस्क व युरोपीयन युनियनच्या चेरीअल मीलर या पाहुण्यांचे शनिवारी सायंकाळी शहरात आगमन झाले, तर उर्वरित रविवारी शहरात येतील. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात जी-20 च्या पार्श्वभूमीवर एक हजार महिलांची सभा होणार असून, विदेशी पाहुणे संवाद साधणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
दिमाखदार सोहळ्यात वेरूळ- अजिंठा महोत्सवास सुरुवात; कथ्थक, भरतनाट्यम आणि लावणीने रसिक मंत्रमुग्ध