(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Inside Story: शिवसेना नेत्यांची सभेसाठी अन् अधिकाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ
शिवसैनिक सभेच्या तयारीत व्यस्थ आहेत, तर दुसरीकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत.
Aurangabad News: औरंगाबाद शहर सद्या दोन कारणांनी मोठ्याप्रमाणावर चर्चेत आला आहे. पहिलं कारण म्हणजे औरंगाबाद शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या होणारी सभा. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात होणाऱ्या उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी करणं जेवढ शिवसैनिकांसाठी महत्वाचे आहे, तेवढच पाणी टंचाईवर मार्ग काढणे हे अधिकाऱ्यांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे शहरात सद्या शिवसेना नेत्यांची सभेसाठी तर अधिकाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेत्यांची धावपळ...
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवसेनेचे आमदार,खासदार आणि मंत्री स्वतः प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहे. आता सभेला एक दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना नियोजनचा आढावा घेतांना शिवसेना नेत्यांची धावपळ उडत आहे. सभेत कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नयेत याची दखल घेतली जात आहे. तसेच राज ठाकरेंच्या सभेसोबत उद्धव ठाकरेंच्या सभेची तुलना केली जात असल्याने सभेला मोठी गर्दी जमवण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेनेकडून सुरु आहे.
अधिकारी लागले कामाला...
उद्धव ठाकरेंची एकीकडे सभा होत आहे तर दुसरीकडे शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. उद्या शहरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पाण्याचा आढावा घेतल्यास काय उत्तर देणार असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. म्हणूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून तर महानगरपालिका, वार्ड कार्यालयापर्यंत सर्वच कामाला लागले आहे. तसेच वेगवेगळ्या उपाययोजना राबवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गुन्हे दाखल करणार
शहरांतर्गत आणि पैठण ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनीवर असलेली सर्व अनधिकृत नळजोडणी तातडीने तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित जोडणीधारकांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी मनपा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. तर आजपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.