Aurangabad: कोणत्याही क्षणी जायकवाडीतून पाणी सोडणार; नदी काठच्या गावांना अलर्ट जारी
Aurangabad News:जायकवाडी प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता धरणात सद्या 73.97 टक्के पाणीसाठा आहे.
Aurangabad News: जायकवाडी धरणात सुरु असलेली आवक पाहता जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे धरणाच्या खालच्या गावांना प्रशासनाने तातडीचा हाय अलर्ट जारी केला आहे. तर गोदावरी नदी काठच्या दोन्ही बाजूच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. सोबतच संबंधीत गावांना सावधनतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी असे आवाहन सुद्धा जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जायकवाडी प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता धरणात सद्या 73.97 टक्के पाणीसाठा आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे (R.O.S) परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात धरणाच्या गेटमधुन, सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये पुरपाणी सोडावे लागणार असल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत...
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत असेहि प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना याची माहिती दिली जाईल. त्यांनतर पाणी सोडण्यात येईल अशीही माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. पण पाण्याची आवक पाहता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सुद्धा आवाहन प्रशासनाने केले आहे.
Aurangabad: नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 9 व्यक्तींचा बळी; खासदार जलील हे मात्र दुबईत
धरणाची आत्ताची परिस्थिती...
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 73.97 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 36 हजार 206 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1605.785 दलघमी आहे. धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1516.87 फुट असून, मीटरमध्ये 462.342 मीटर एवढी आहे. त्यामुळे वरील आवक पाहता पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.