Aurangabad: औरंगाबादच्या लासूर भागात रुग्णालयात पाणी, कन्नड-सोयगाव तालुक्यात पिकांचे नुकसान
Aurangabad: लासूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः तळे साचले असून, परिसरातील नागरिकांच्या घरात देखील पावसाचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे.
Aurangabad Rain Update: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान गंगापूर तालुक्यातील लासूर भागात सुद्धा अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे लासूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः तळे साचले असून, परिसरातील नागरिकांच्या घरात देखील पावसाचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागात सद्या पहावे तिकडे पाणीच-पाणी दिसत आहे.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, सावंगी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. ज्यामुळे लासुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरले. रुग्णालयातील औषधालय, रुग्णाच्या वॉर्डात गुढघ्याएवढे साचले होते. तर रुग्णालयात पाणी साचल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसह इतर रुग्णांचे हाल झाले. दरम्यान सावंगी बाजारतळ, बसस्थानकासह नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच सावंगी चौकातील बाजार समितीसमोर पाणी साचून नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ
कन्नड तालुक्यातील करजखेड सर्कलमधील नागापूर, सावरगाव, उबरखेड तांडा या परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासुन सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच जनावरांचा चारा़ देखील पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मका,सोयाबीनला कोंब फुटली आहे. तर वेचणीला आलेला कापूस पावसाने काळा पडत आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकराने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत.
वरठाण परीसरात कापसाचे नुकसान...
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील वरठाणसह परीसरात परतीच्या पावसामुळे वेचणीसाठी आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. यंदा वरठाणसह बनोटी, गोदेंगाव, पहुरी, कींन्ही, मोहळाई, बोरमाळ तांडा, वाकडी, तिडका, पळाशी, वाडी, तितुर, हनुमंतखेडा आदी परीसरात मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकाची लागवड झालेली होती. परंतु सुरवातीच्या वेचणीपासुन परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान करायला सुरवात केली. सततच्या पावसामुळे कापसाच्या झांडाची पाने लाल होऊन गळून पडली. त्यामुळे लागवड सुद्धा घटली, त्यातच आता वेचणी सुरु झाली असतानाच पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उरल्यासुरल्या कापसाच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
संबंधित बातम्या...