Aurangabad: कर्जाला कंटाळून बांधकाम ठेकेदाराने घर सोडले, पत्नीची पोलिसात धाव
Aurangabad: या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, कर्जाला कंटाळून एका बांधकाम ठेकेदाराने चक्क घर सोडले आहे. नंदकिशोर रामराव नांदेडकर (49, रा. विजयंतनगर, सातारा परिसर) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. तर नंदकिशोर यांनी कर्जाच्या त्रासाला कंटाळून घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिसात धाव घेत याबाबत मिसिंग दाखल केली आहे. तर या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता नंदकिशोर नांदेडकर यांनी सातारा ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, नंदकिशोर यांनी व्यवसायासाठी लोकांकडून कर्ज घेतले होते. जवळपास 50 लाख रुपयांचे देणे थकले आहे. सोबतच 50 लाख रुपयांपर्यंतची रक्कम लोकांकडे अडकलेली आहे. त्यामुळे कर्जाचे पैसे देण्यात अडचणी निर्माण होत आहे. दरम्यान ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक पैशांसाठी सतत तगादा लावत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहून नंदकिशोर नांदेडकर बेपत्ता झाले. त्यांनी मोबाइलही सोबत नेलेला नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.
कोण आहेत नंदकिशोर नांदेडकर
नंदकिशोर नांदेडकर हे बांधकाम ठेकेदार असून, ते अन्य बिल्डरांनी उभारलेल्या गृहप्रकल्पात लाईट फिटिंगची कामे करीत असत. शहरातील मोठ-मोठ्या बिल्डरांच्या गृहपकल्पाचे त्यांनी हे काम केलेले आहे. मात्र, काही बिल्डरांनी त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे नांदेडकर हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते. त्यांची बऱ्याच दिवसांपासून घुसमट सुरू होती. अखेर, त्यांनी लोकांचा त्रास सहन न झाल्याने शेती आणि कार्यालय लिहून दिले. तरीही, पैशांसाठी तगादा सुरूच राहिला. त्यामुळे ते चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेले आहेत.
पोलिसांचे आवाहन...
याबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत, सावळा रंग, सडपातळ बांधा, पाच फूट आठ इंच उंची, चेहरा गोल, काळे केस, सरळ नाक, अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट व पायात सँडल असून, अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सातारा पोलिसांशी संपर्क साधावा असे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
औरंगाबाद येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि 'क्रेडाई'चे खजिनदार अनिल महादेवराव अग्रहारकर यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. तर त्यांची आत्महत्या सुद्धा आर्थिक देवाणघेवाणमधून झाल्याचे समोर आले होते. 30 कोटींचं कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून 68 लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र कर्ज मिळाले नाही आणि दिलेले पैसे सुद्धा परत मिळत नसल्याने त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.