थरार! तुफान वेग अन् चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या; 'समृद्धी'वरील अपघाताची मालिका सुरूच
Samruddhi Highway: अपघातात चारचाकी कार नागपूरकडे जाणारा रस्ता ओलांडून चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन आदळली.
Samruddhi Highway: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण करण्यात आले. मात्र हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करताच यावरील होणाऱ्या अपघाताची (Accident) मालिका चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा असाच वेगाच्या थरारातून झालेल्या अपघाताची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) लासूर स्टेशन परिसरात घडली आहे. ज्यात सुदैवाने सहा जणांचा जीव बचावला आहे. विशेष म्हणजे या अपघातात चारचाकी कार नागपूरकडे जाणारा रस्ता ओलांडून चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन आदळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी (Shirdi) येथून एक चारचाकी कार (Four Wheeler Car) (MH 31 EK 1362) समृद्धीवरून नागपूरच्या (Nagpur) दिशेने जात होती. दरम्यान गाडीत असलेल्या प्रवाशांसोबत आणखी एक कार होती. मात्र सोबत असलेली कार वेगाने पुढे निघून गेल्याने, पाठीमागे पडलेल्या गाडीच्या चालकाने आपल्या गाडीचा वेग वाढवला. पाहता-पाहता ही कार एखाद्या चित्रपटात शोभेल अशा थरारक पद्धतीने वेगाने जात होती. मात्र याचवेळी लासूर स्टेशनच्या पुढे निघाल्यानंतर गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडीचे चाक फुटले. गाडीचा वेग प्रचंड असल्याने कारचा अपघात होताच ती नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून क्रॉसिंग करीत शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार वेळा कोलांट्या मारत आदळली.
सुदैवाने मोठा अनर्थ टळला...
अपघाताच होताच रस्यावर प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक मदतीला धावून आले. तसेच समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारी, रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहचल्याने जखमींवर रुग्णवाहिकेतच तत्काळ उपचार करण्यात आले. या गाडीमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुले होती. मात्र सुदैवाने या भीषण अपघातात त्यांना गंभीर इजा झाली नसून, किरकोळ जखमा झाल्या आहेत.
अपघाताची मालिका सुरूच....
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहेत. अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरे समोर आल्याने त्यांना वाचवण्याच्या नादात देखील अपघात होत आहे. गेल्या आठवड्यात सात दिवसांत समृद्धीवर महामार्गावर तब्बल 30 अपघात (Accident) झाले होते. तर वेगवेगळ्या 65 घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाल्याचे समोर आले होते.
समृद्धीवर महामार्गावर सात दिवसांत 30 अपघात, तर 65 घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत