समृद्धीवर महामार्गावर सात दिवसांत 30 अपघात, तर 65 घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करताच यावरील होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे.
Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण करण्यात आले. समृद्धीवर महामार्गाचे उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे. कारण गेल्या सात दिवसांत समृद्धीवर महामार्गावरतब्बल 30 अपघात (Accident) झाले आहेत. तर वेगवेगळ्या 65 घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. 'लोकमत'ने याबाबत वृत्त दिले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा गाजावाजा आणि शक्तिप्रदर्शन करत देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताच यावरील होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. समृद्धी महामार्गावर 120 पर्यंत वेगमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक अतिवेगाने वाहने चालवीत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. शिर्डी ते नागपूर दरम्यान आतापर्यंत 30 अपघात झाले आहेत. तर वेगवेगळ्या 65 घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावरबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघात...
- नागपूर जिल्ह्यातील टोलनाक्याजवळच दोन कारचा अपघात, अपघातात गाडीचा अक्षरशः चुराडा.
- जालना जिल्ह्यातील सोमठाण्याजवळ कार लोखंडी खांबाला धडकली.
- पिंप्रीमाळी (जि. बुलढाणा) परिसरात दुभाजकाच्या खड्डयात ट्रक उलटून अपघात.
- वाशिममध्ये केनवड येथे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात.
- औरंगाबाद जिल्ह्यातील घायगाव शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतला.
- अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे लग्नवन्हाडाच्या कारचा टायर फुटल्याने अपघात.
- सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या कार अपघातात बालकासह तीनजण जखमी.
- जालना येथील निधोना इंटरचेंजजवळ ट्रक उलटल्याने अपघात.
दुचाकीचा वावर...
समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर येत आहेत.