Aurangabad: बंडखोर आमदारांचे समर्थक आणि शिवसैनिकांचा वाद पेटला; प्रकरण थेट उद्धव ठाकरेंच्या दरबारी
Aurangabad News: आमदार बोरनारे यांच्यासोबत गेलेल्या लोकांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट बनवत भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केले. मात्र त्यांनतर सुरु झालेला शिंदे गट आणि शिवसैनिकांमधील संघर्ष अजूनही संपलेला नाही. विशेष म्हणजे वरच्या पातळीवर सुरु असलेला हा वाद आता स्थानिक पातळीवर येऊन पोहचला आहे. औरंगाबाद येथील वैजापूरच्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे वैजापूर तालुक्यात आता शिंदे गट अनु शिवसेना असे दोन गट पडले आहे. तर बोरनारे यांच्या समर्थकांनी शिंदे गटात सामील होणे पसंद केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने असण्याची शक्यता आहे. म्हणूनच बोरनारे यांच्यासोबत गेलेल्या लोकांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या दरबारी...
वैजापूर येथील शिवसेना पदाधिकारी यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोरनारे समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वैजापूर येथील शिवसैनिकांनी केली आहे. तसेच आम्ही शिवसेना सोबत असून, पुढेही राहू असेही यावेळी पदाधिकारी म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या मागणीमुळे भविष्यात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवर बैठकांवर-बैठका
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे राज्यभरातील पदाधिकारी यांची भेटी घेऊन बैठका घेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुद्धा प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यांची भेट घेऊन आढावा घेण्यात आला. ज्यात औरंगाबाद शहरातील शिवसेना पदाधिकारी यांनी सुद्धा ठाकरे यांची भेट घेतली. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मुंबईत ठाण मांडून असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकारी आणि नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
Aurangabad: शिवसेनेचा आमदार 'मृत कुटुंबा'ची सांत्वन करून आला; शिंदे गटाचा आमदार मदत घेऊन पोहचला