Aurangabad: कुत्रे पकडण्याच्या कंत्राटात घोटाळा?; माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड
Dog Scam: गेल्या सात वर्षात तब्बल 28 हजार 533 कुत्रे पकडल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
Dog Scam: आत्तापर्यंत आपण अनेक घोटाळे पाहिले असतील, मात्र औरंगाबादच्या महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) झालेल्या एका घोटाळ्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. कारण याठिकाणी चक्क कुत्रे पकडण्यासाठी दिलेल्या कंत्राटातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आला असून, घोटाळा झाला तेव्हा पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता होती. तर माहितीच्या अधिकारातून मागवलेल्या माहितीतून हा घोटाळा समोर आला असल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरात गेल्या सात वर्षात किती कुत्रे पकडण्यात आले याची माहिती भाजपचे नगरसेवक गोकुल मलके यांनी माहितीच्या अधिकारातून महापालिकेकडून मागवली होती. तसेच कोणत्या एजन्सीच्या मार्फत हे कुत्रे पकडण्यात आले आणि त्यांच्यावर किती खर्च झाला याचाही माहिती मागवली होती. मात्र महानगरपालिकेने दिलेली माहिती पाहून मलके यांना धक्काच बसला. कारण गेल्या सात वर्षात तब्बल 28 हजार 533 कुत्रे पकडल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. तर यासाठी तब्बल 2 कोटी 66 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
कुत्रे पकडण्याच्या कंत्राटात शिवसेना पदाधिकाऱ्याची एजन्सी
मलके यांनी मागवलेल्या माहितीत ज्या एजन्सीला काम देण्यात आले होते त्यांचीही माहिती देण्यात आली आहे. ज्यात महाराजा एजन्सी औरंगाबाद,ब्ल्यू क्रॉस सोसायटी पुणे,होप अँड अनिमल ट्रस्ट झारखंड,जया इंटर प्राईजस राजस्थान, अरिहंत वेलफेअर सोसायटी, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. पण भाजपने यावर आक्षेप घेत जो आरोप केला आहे तो धक्कादायक आहे. कारण सुरुवातीला दोन वर्ष ज्या महाराणा एजन्सीने औरंगाबाद शहरातील कुत्रे पकडले तीच एजन्सी आता औरंगाबाद महानगरपालिकेत मनुष्यबळ पुरवत आहे. एवढंच नाही तर जवळजवळ 1500 मनुष्यबळ ही एजन्सी महापालिकेला पुरवत असल्याचं समोर आलं आहे. इंटरेस्टिंग म्हणजे ही एजन्सी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
कुत्रे पकडण्याच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार
भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हंटल आहे की, महानगरपालिकेत जेव्हा माणसं पुरवण्याचं कंत्राट मिळालं तेव्हा सुध्दा या एजन्सीने कुत्रे पकडणे सोडलं नाही. कारण झारखंड, उस्मानाबाद, राजस्थान सारख्या ठिकाणची जी एजन्सी दाखवण्यात आली आहे, ती सुद्धा आधीच्या महाराजा एजन्सी असलेल्या लोकांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व कुत्रे पकडण्याच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असून चौकशी करण्याची मागणी प्रमोद राठोड यांनी केला आहे.
वर्षे | पकडलेली कुत्रे | खर्च | एजन्सी |
2015-16 | 672 | 4,20,000 | महाराजा एजन्सी औरंगाबाद |
2016-17 | 307 | 1,91,000 | महाराजा एजन्सी औरंगाबाद |
2017-18 | 75 | 67,000 | मनपा औरंगाबाद |
2018-19 | 3440 | 3,096,00 | ब्ल्यू क्रॉस सोसायटी पुणे |
2019-20 | 4534 | 43,07,300 | होप अँड अनिमल ट्रस्ट झारखंड |
2020-21 | 10681 | 83,82,800 | जया इंटर प्राईजस राजस्थान |
2021-22 | 8824 | 2,66,11,050 | अरिहंत वेल्फर सोसायटी उस्मानाबाद |
एकूण | 28,533 | 2,66,11,050 |