(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा
Aurangabad News: एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
Chief Minister Eknath Shinde visit to Aurangabad: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरत आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला शिवसेनेचा वैजापूरमध्ये होणार विरोध पाहता वैजापूर पोलिसांकडून सेनेच्या पदाधिकारी यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. वैजापूर येथील महालगावात मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे, तर याच सभेत शिवसेनेकडून गोंधळ घातला जाऊ नयेत म्हणून, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, ऍड. आसाराम रोठे, किसान आघाडीचे जिल्हा संघटक संजय निकम, युवा सेनेचे अक्षय साठे यांना पोलीसांनी शांतता राखण्यासाठी नोटीस बजावली आहे.
ठीक-ठिकाणी बंदोबस्त...
नाशिक जिल्ह्यातील दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहनाने वैजापूरला येणार आहे. ज्या मार्गाने मुख्यमंत्री येणार आहेत, त्याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच बंदोबस्तावर तैनात असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
बोरनारे यांना शिवसैनिकांचा विरोध...
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या याच भूमिकेला तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी विरोध दर्शविला आहे. तर बंडखोर आमदारांना धडा शिकवला जाईल असे शिवसेनेच्या नेत्यांकडून अनेकदा बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात कोणताही गोंधळ उडू नयेत म्हणून, पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर
शिंदेंच्या आधी आदित्य ठाकरेंचा दौरा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी वैजापूर येथे दौरा करत आहेत. मात्र त्यांच्या याच दौऱ्यापूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वैजापूर येथे 'शिवसवांद यात्रा' काढली होती. त्यांच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री यांचा दौरा होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखीच वाढत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे.