(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime: चक्क सुपारी घेऊन चोरायचे दुचाकी; चोरट्यांचा नवीन फंडा पाहून पोलीसही चक्रावले
Crime News:
Aurangabad Crime News: आतापर्यंत आपण सुपारी देऊन हत्या केल्याच्या अनेक घटना पहिल्या असतील. मात्र औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चक्क दुचाकी चोरण्यासाठी सुपारी दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोघांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पैठण येथील आठवडी बाजार असल्याने पोलिसांची पेट्रोलिंग सुरु होती. यादरम्यान पोलिसांकडून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका दुचाकीवर जाणाऱ्या दोघांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यांना अडवून त्यांची चौकशी केली असता त्यांचे उत्तर पोलिसांना समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यांनतर त्यांची अधिक माहिती काढली असता त्यांच्यावर मोटारसायकल चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
सुपारी घेऊन चोरायचे दुचाकी...
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. तसेच आम्ही दुचाकी चोरीची सुपारी घेत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दुचाकी चोरून टोळीप्रमुखाला नेऊन द्यायची, त्यांनतर ठरलेली रक्कम घेऊन यायची असा हा सर्व चोरीचा खेळ सुरु असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे सुपारी देणाऱ्या टोळीप्रमुखाला ताब्यात घेण्यासाठी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पथक रवाना केले आहे. तर पकडलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोटारसायकल चोरीचा नवा फंडा...
आतापर्यंत मोटारसायकल चोरून भंगारात किंवा चोर बाजारात विकण्याची चोरट्यांची पद्धत पोलिसांच्या तपासात अनेकदा समोर आली आहे. मात्र गाडी चोरल्यावर तिला संभाळने, मग तिला विकण्यासाठी ग्राहक शोधणे या सर्व कटकटीतून मार्ग काढण्यासाठी मोटारसायकल चोरट्यांनी नवीन फंडा शोधून काढला आहे. सगळ्या गाड्यांचे दर ठरवून घायचे, त्यानुसार गाडी चोरून आणून द्यायची आणि आपले पैसे घेऊन मोकळे व्हायचे. त्यामुळे बाकी सर्व भानगडीत न पडता सुपारी घेऊन दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा पाहून पोलीस सुद्धा चक्रावले आहे.