Aurangabad: याला म्हणतात राजकारण...,एक निवडणूक दोन दावे; थेट मंत्र्याचीच प्रतिष्ठा लागली पणाला
Aurangabad News: एकाच निवडणूकीच्या विजयावर शिंदे आणि शिवसेना गटाने दावा केला आहे.
Aurangabad News: असे म्हणतात की, राजकारण समजून घेणं आणि राजकारण करणं एवढं सापे नसते. त्यातच गावातील राजकारण म्हंटले तर भल्याभल्यांची धांदल उडते. आता असेच काही चित्र औरंगाबादच्या बिडकीन गावात पाहायला मिळाले आहे. गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीची निवडणूक झाली. संपूर्ण 13 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडणून सुद्धा आले. पण आता या विजयावर दोन वेगवेगळ्या गटाने दावा केला आहे. शिंदे गटाचे म्हणणे आहे की सर्व उमेदवार आमचे आहेत, तर दुसरीकडे शिवसेना म्हणते सर्व विजयी उमेदवार आमच्या गटाचे आहे. विशेष म्हणजे याच गावात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती. तर कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील हे महत्वाचे गाव समजले जाते.
नेमकं काय घडलं...
भुमरे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतलेल्या बिडकीन गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीची निवडणूक आज पार पडली. एकूण 13 जागांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली. त्यांनतर सोसायटीच्या चेरअमन पदी बबन ठाणगे यांची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी हारून जिलानी यांची निवड झाली. निवडणुकीचा निकाल लागल्यावर संपूर्ण 13 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने जिंकल्या असून, चेरअमन पदी निवड झालेले बबन ठाणगे शिवसेना गटाचे असल्याचा दावा शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी केला. मात्र काही तासात शिंदे गटाने बबन ठाणगे आमच्या गटाचे असल्याचा दावा केला.
खरा विजय कुणाचा...
बिडकीन गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवरील विजय आमचा असल्याचा दावा जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेने केला असला तरीही, चेरअमन पदी निवड झालेले बबन ठाणगे यांनी आपण शिंदे गटाचे असल्याचा दावा केला आहे. तसेच कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
फोटोवरून उडाला गोंधळ...
निवडणूक झाल्यावर चेरअमन पदी निवड झालेले बबन ठाणगे यांनी उद्धव ठाकरेंच्या गटासोबत फोटोग्राफी केली. त्यांनतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र काही वेळेतच ठाणगे यांचे दुसऱ्या गटासोबतचे फोटो समोर आले. त्यामुळे आता एक निवडणूक दोन दावे अशी परिस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणूकमुळे राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.