Aurangabad: भुमरेंनी 'उजूक' मंत्री व्हावं, पण...; राष्ट्रवादी-काँग्रेसकडून पैठणमध्ये जोरदार निदर्शने
Aurangabad News: पैठण तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Aurangabad Protest: शिंदे सरकारमध्ये रोहयो मंत्री असलेले संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आले. अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईमधून औरंगाबाद जिल्ह्याला वगळण्यात आल्याने आणि शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळत नसल्याने सरकारच्या विरोधात हे निदर्शने करण्यात आले. यावेळी पैठण तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भुमरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठणमध्ये आज शिंदे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले आहे. अशात सरकराने पैठण तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळले आहे. पैठण तालुक्याचे आमदार कॅबिनेट मंत्री असतानाही देखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तर यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. तर भुमरेंनी 'उजूक' मंत्री व्हावं,मुख्यमंत्री व्हावे मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केली.
आंदोलनकर्त्यांची मागणी...
यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, औरंगाबादसह पैठण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वगळण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देखील मागील तीन वर्षापासून मिळाला नाही. शेजारच्या जिल्ह्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो, पण पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना मुद्दामून वगळण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे मोठं नुकसान...
राज्यात जनावरांच्या लंपी आजाराने थैमान घातले असून, पैठण तालुक्यात लंपी रोगाची अजूनही लस उपलब्ध नाही. तसेच त्याबाबत प्रशासन उदासीन असून, शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले आहे. पैठण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. परंतु त्यांना अनुदान वाटपाविषयी कुठलीही गोष्ट अद्याप पर्यंत झालेली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
विरोधक एकवटले...
पैठणमध्ये करण्यात आलेल्या निदर्शनेच्यावेळी भुमरे यांच्या विरोधकांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांच्यासह अनेकांची हजेरी यावेळी पाहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: विद्यापीठातील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद; पुतळा चुकीच्या दिशेने बसवल्याचा आरोप
Aurangabad: उसने घेतलेल्या पैश्यांच्या बदल्यात महिलेवर बळजबरीने अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल