Imtiaz Jaleel: भुमरेंना पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहून संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढला असावा; जलील यांचा चिमटा
Aurangabad : आपण बसणाऱ्या खुर्चीवर आता भुमरे बसले असल्याने शिरसाट यांचा रक्तदाब वाढला असावा असे जलील म्हणाले.
Aurangabad News: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते समजले जाणारे संजय शिरसाट यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना चिमटा काढला आहे. काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संदिपान भुमरे यांना पालकमंत्रीच्या खुर्चीवर पाहून शिरसाट यांचा रक्तदाब वाढला असावा अशी खोचक प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे.
याबाबत एबीपी माझाला बोलतांना जलील म्हणाले की, काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिरसाट माझ्यासोबतच बसले होते. आमच्यात बऱ्याच गप्पागोष्टी सुद्धा यावेळी झाल्या होत्या. तर जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यावेळी संजय शिरसाट आक्रमकपणे भूमिका मांडत होते. त्यामुळे शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार याबाबत सर्वांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सर्वांना मंत्रिपद मिळाले आणि शिरसाट यांना वगळण्यात आले. त्यामुळे जेव्हा भुमरे यांना शिरसाट यांनी पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहिले, त्यावेळी या खुर्चीवर मी बसणार होतो असे त्यांना वाटले असावे. आपण बसणाऱ्या खुर्चीवर आता भुमरे बसले असल्याने शिरसाट यांचा रक्तदाब वाढला असावा असे जलील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा...
याबाबत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ माहिती देताना म्हणाले की, संजय शिरसाट यांना चिकलठाणा विमानतळावरून एअर लिफ्टने मुंबईकडे नेण्यात आले. तर सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी त्यांना रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले. तसेच पुढील 4 ते 6 तास ते डॉक्टरांच्या निगराणीखाली राहणार असल्याचे जंजाळ म्हणाले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच शिंदे यांनी स्वतः कार्डीओलॉजिस्ट असलेल्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्यासोबत चर्चा करुन सिरसाट यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात चर्चा केल्याचेही समोर आले आहे.
कार्डीओलॉजीकल तपासणीसाठी मुंबईला
शिरसाट यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. अजय रोटे म्हणाले की, त्यांचा रक्तदाबाचा त्रास होता. छातीमध्ये वेदना होत होत्या त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यामुळे रक्तदाब कमी करण्याची औषध देण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले. मात्र त्यांची कार्डीओलॉजीकल तपासणीसाठी मुंबईला जाण्याची इच्छा होती. त्यामुळे ते मुंबईला गेले असल्याचे रोटे म्हणाले.
संबंधित बातमी...
Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना