(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: दोन मुलींसह आईने तुडुंब भरलेल्या विहिरीत घेतली उडी; औरंगाबादच्या झोडेगावातील घटना
Aurangabad News: शोकाकुल वातावरणात मृत आकांक्षावर झोडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील झोडेगावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींसह पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी (Suicide Attempt) घेतली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. तर वेळीच दोघे मदतीला आल्याने आईसह एक मुलीला वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका 10 वर्षांच्या मुलीचं मात्र यात मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहेरी जाते म्हणून घरून निघून गेलेल्या महिलेने गावाच्या कडेला असलेल्या शिवना नदीतिरावरील विहिरीत दोन मुलींसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना झोडेगावातघडली आहे. यात आई व लहान मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र मोठ्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्योती गौतम पठारे (वय 40) ही महिला शनिवारी दुपारी दोन वाजेच्यासुमारास माहेरी जात असल्याचे सांगून मोठी मुलगी आकांक्षा (10) व आराध्या (4) यांना घेऊन घराबाहेर निघून गेली होती.
थेट विहिरीत घेतली उडी...
माहेरी जात असल्याचं सांगून निघालेल्या ज्योती या गावाच्या बाहेर शिवना नदी तिरावर असलेल्या एका विहिरीवर पोहचल्या. त्यानंतर काही वेळेत त्यांनी दोन्ही मुलींसह विहिरीत उडी घेतली. हा प्रकार महिलेचा पती गौतम पठारे यांचे भाचे प्रकाश भालेराव व प्रवीण भालेराव यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ विहिरीत उडी मारून आई ज्योती व लहान मुलगी आराध्या यांना वाचविले. मात्र मोठी मुलगी आकांक्षा हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आकांक्षावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
याची माहिती मिळताच गावातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तिघींनाही सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून आकांक्षाला मृत घोषित केले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात मृत आकांक्षावर झोडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरु...
ज्योती यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे सर्वानाच धक्का बसला आहे. ज्योती यांचे पती गौतम पठारे यांना अर्धागवायू झालेला आहे. त्यांना दोन मुली होत्या. तर ज्योती पठारे यांनी दोन मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेख करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.