Aurangabad: मराठा क्रांती मोर्च्याच्या बैठकीला सुरवात; महत्वाच्या विषायांवर चर्चा
Aurangabad News: या बैठकीत मराठा आरक्षणासह विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
Aurangabad News: मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने आज औरंगाबाद येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. शहरातील एपीआय कार्नर परिसरातील मिंट हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासह विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची सुद्धा याठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली.
या विषयांवर चर्चा...
- मराठा आरक्षण
- EWS आरक्षण
- शासकीय सेवेमधील विद्यार्थ्यांना येत असलेल्या नियुक्तीच्या अडचणीबाबत
- सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न
- अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या प्रश्न व इतर विषय
बैठीकाला मोठी गर्दी...
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोबतच मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची सुद्धा उपस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद केंद्रबिंदू...
मराठा आरक्षणाच्या मागणीत औरंगाबाद आधीपासूनच केंद्रबिंदू ठरला आहे. राज्यात निघालेल्या 58 मोर्च्यातील पहिला मोर्चा औरंगाबाद शहरात निघाला होता. तसेच मराठा क्रांती मोर्च्याची घोषणा सुद्धा औरंगाबादमधूनच झाली आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा औरंगाबादचेच आहे. म्हणूनच मराठा आरक्षणाच्या लढाईत औरंगाबादची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागून आहे.