Aurangabad Crime News: बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने मित्रमंडळी हिणावत होती; म्हणून भर रस्त्यात मेहुण्याला संपवलं
Aurangabad News: बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील मित्रमंडळी आणि नातेवाईक सतत हिणावत असल्यानेचं आपण बहिणीच्या पतीची हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद पुणे महामार्गावर एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या (Aurangabad News) ईसरवाडी फाट्याजवळ घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने हत्येची कबुली देखील दिली आहे. तर बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील मित्रमंडळी आणि नातेवाईक सतत हिणावत असल्यानेचं आपण बहिणीच्या पतीची हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सुनील नाटकर असे आरोपीचे नाव असून, बाबासाहेब खिल्लारे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी सुनील याची बहिण हिना हिने बाबासाहेब खिल्लारे याच्याशी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. या घटनेनंतर गावातील मित्रमंडळी व नातेवाईक सतत सुनीलला हिणावत होते. यामुळे बाबासाहेबामुळे आपली बदनामी होत असल्याचा राग सुनीलला आला होता. त्यामुळे बाबासाहेबचा कायमचा काटा काढण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. अशातच मेहुणा बाबासाहेब इसारवाडी फाट्यावर असल्याची माहिती सुनीलला मिळाली आणि तो तिथे पोहचला. बाबासाहेबला रस्त्यात अडवून कुऱ्हाडीने एकामागून एक असे वार सुरू केले. ज्यात बाबासाहेब जागेवरच कोसळला आणि त्याने प्राण सोडले.
जीव जाताच कपडे काढून नाचला!
बाबासाहेबने आपल्या बहिणीला पळूवन नेल्याने गावात बदनामी होत असल्याचा राग सुनीलच्या मनात होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेबचा जीव घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याची तो संधी शोधत होता. याचवेळी शुक्रवारी बाबासाहेब इसारवाडी फाट्यावर आल्याची त्याला माहिती मिळाली. माहिती मिळताच हातात कुऱ्हाड घेऊन तोही तिथे पोहचला. बाबासाहेब दिसताच त्याला रस्त्यात अडवून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे बाबासाहेबने जीव सोडल्याची खात्री झाल्यावर सुनीलने अंगातील शर्ट काढून जल्लोष केला. मृतदेहाजवळ नाचला आणि त्यानंतर दुचाकीवरून फरार झाला असल्याची माहिती प्रत्यदर्शीने सांगितले.
आई-वडील म्हणाले पोलिसांना शरण जा!
बाबासाहेब याची हत्या केल्यावर सुनील दुचाकीवरून अहमदनगरच्या दिशेने पसार झाला होता. रात्रीच्या सुमारास आपल्या घरी पोहोचला. घरी गेल्यानंतर त्याने आई-वडिलांना मी बाबासाहेब यांचा खून करून आलो असल्याचे सांगितले. त्यावर त्याच्या आई- वडिलांनी 'तू येथे कशाला आला. आता आम्हाला बाबासाहेब याचे नातेवाईक मारून टाकतील. तू पोलिसांना शरण जा, असे सांगून त्याला घराबाहेर काढले. तेथून निघाल्यावर सुनील हा श्रीरामपुरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाळूज पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तर न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
संबंधित बातम्या: