Gopichand Padalkar: पवार कुटुंबातील लोकं बावचळले, त्यांना मी 'सळो की पळो करून सोडलं'; पडळकरांची टीका
Gopichand Padalkar On Ajit Pawar: पवार कुटुंबाला मी 'सळो की पळो करून सोडलं' असून, त्यामुळे पवार कुटुंबातील लोकं बावचळले असल्याची टीका पडळकरांनी केली आहे.
Gopichand Padalkar On Ajit Pawar: आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गोपीचंद पडळर यांच्याबाबत प्रश्न विचारला असता "अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधिल नाही" असे म्हणत त्यांनी पडळकरांवर निशाणा साधला होता. आता अजित पवार यांच्या याच टीकेला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे. पवार कुटुंबाला मी 'सळो की पळो करून सोडलं' असून, त्यामुळे पवार कुटुंबातील लोकं बावचळले असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पडळकर म्हणाले की, या पवार कुटुंबाला मी पुरून उरलो आहे. त्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. त्यामुळे अजित पवार आता निरुत्तर असून, त्यांच्याकडे उत्तर राहिले नाही. त्यांना योग्य उत्तर मी बारामतीत जाऊन देणार आहे. त्यांचे सरकार असतांना देखील त्यांना मी राज्यभरात सळो की पळू करून सोडले होते. आज आमची सत्ता असतांना देखील मी लोकांमध्ये जात आहे. त्यांच्यासोबत असलेली आणि गैरसमजुतीतून त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना मी बाजूला करत आहे. त्यामुळे पवार कुटुंब बावचळून गेल्यासारखं करत आहे. म्हणूनच ते अशाप्रकारे वक्तव्य करत असल्याच पडळकर म्हणाले.
अजित पवार 'कीस झाड की पत्ती'
पुढे बोलतांना पडळकर म्हणाले की, बरोबरी ठरवायचा अधिकार अजित पवारांना कोणी दिला नाही. जनतेने त्यांना जास्तीचे मते दिली म्हणून, त्या मस्ती आणि माजात त्यांनी जाऊ नयेत. या जनतेने अनेक लोकांना घरी बसवलं आहे. इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला होता, त्यामुळे अजित पवार 'कीस झाड की पत्ती' आहे. त्यांना सुद्धा काही काळामध्ये उत्तर मिळणार आहे. नागरिकांनी अनेकदा आमदार बनवलं पण तेथील 44 गावांना पाणी पाजू शकत नाही. बारामती शहराच्या विकासाचा गाजावाजा करतात, पण तिथेच शहराच्या बाजूला टँकरने पाणी पाजावा लागत आहे.
पवारांना दीर्घ आयुष्य लाभो!
शरद पवारांवर होणाऱ्या शस्त्रक्रियावर बोलतांना पडळकर म्हणाले की, मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की, त्यांची जी काही शस्त्रक्रिया असेल किंवा त्यांच्या डोळ्याचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा. त्यांच्यावर योग्य ते उपचार होतील. माझा राजकीय विषय आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले असावे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे, 100 वर्षांपर्यंत त्यांना आयुष्य लाभावे आणि महाराष्ट्रभर आम्ही जे काही काम करत आहोत ते त्यांना पाहायला मिळावे असेही पडळकर म्हणाले.