Crime: आधी एका मुलीची छेड काढली, पोलिसांत तक्रार होताच त्याने केलं असं काही की...
Aurangabad : एसबी कॉलेजजवळील एका वसतिगृह परिसरात मुलीची छेड काढण्यात आल्याचा कॉल डायल 112 वर आला होता.
Aurangabad Crime News: आधी एका मुलीची छेड काढली, तिने पोलिसांत तक्रार केल्याचे समजताच आरोपीने चक्क घरी जाऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न (Suicide Attempts) करत स्वत:ला कोंडून घेतले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याने आत्महत्याचं नाटक केल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणाचा कॉल डायल 112 ला येताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी जात या प्रकरणाचा पर्दाफाश केला. एसबी कॉलेजच्या परिसरात हा प्रकार घडला आहे.
याबाबत क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास एसबी कॉलेजजवळील एका वसतिगृह परिसरात मुलीची छेड काढण्यात आल्याचा कॉल डायल 112 वर आला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने तत्काळ क्रांती चौक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र छेड काढणारा मुलगा तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. पीडितेने त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्याने तो घाबरून त्याच्या घरी गेला. पोलिसांना स्थनिकांनी तो त्याच्या खोलीवर गेल्याचे सांगितले.
लोकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ त्याचे घर गाठले. पोलीस घरी पोहचत नाही तो आत्महत्येची धमकी देऊन खोलीत गेल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेरून आवाज दिला, परंतू तो प्रतिसाद देत नव्हता. अखेर पोलिसांनी मदतीसाठी 112 डायलच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून दरवाजा तोडत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी अंगावर टाकले पाणी
पोलिसांनी मुलाला बाहेर येण्याची आणि दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 112 डायलच्या कर्मचाऱ्यांना बोलावून पोलिसांनी दरवाजा तोडला. मात्र यावेळी मुलगा जमिनीवर पडलेला दिसून आला. तर याचवेळी छताला साडी बांधलेली होती. पोलिसांना त्याच्या नाटकाचा संशय आला व त्यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकले. पोलिसांना आपले नाटक कळाल्याचा अंदाज आल्यावर तो उठला आणि घडाघडा बोलायला लागला.
दवाखान्यात जाण्यास नकार...
पोलिसांनी मुलाच्या अंगावर पाणी टाकून त्याला उठवले. तसेच त्याला त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यामुळे मुलगा नाटक करत असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे या सर्व घटनेची क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या...
संतापजनक! भाजी आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर रेकॉर्डवरील दरोडेखोराकडून बलात्कार
Dasara Melava: दसरा मेळाव्याच्या भाषणात अंबादास दानवेंची जीभ घसरली; पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य