संतापजनक! भाजी आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर रेकॉर्डवरील दरोडेखोराकडून बलात्कार
Aurangabad Crime News: गुन्हे शाखा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज भागातील जिकठाण शिवारात एक संतापजनक घटना समोर आली असून, भाजी आणण्यासाठी शेतात गेलेल्या 58 वर्षीय महिलेला एकटी गाठून नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या घटनेनंतर गुन्हे शाखा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. शक्तूर लक्षाहरी भोसले (वय 25, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून, तो रेकॉर्डवरील दरोडेखोर असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज भागात राहणारी 58 वर्षीय शेतकरी महिला दुपारच्या सुमारास वाळूज गावात आठवडी बाजाराला गेली. तर बाजार करून दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या खासगी वाहनाने लिंबेजळगावपर्यंत गेल्या आणि तेथून पायी जिकठाण शिवारातील शेतात गेल्या. दुसऱ्या दिवशी नवरात्रीचे उपवास सुटणार असल्याने त्यांनी उपवास सोडण्यासाठी लागणारी आंबाड्याची भाजी शेतातून घेतली. त्यानंतर त्या घराकडे पायी निघाल्या असतानाच एक अनोळखी समोरून आला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांना बाजुच्या कपाशीच्या शेतात ओढत नेले.
आरोपीने या महिलेला शेतात ओढत नेऊन, अंगावरील दागिने देण्यासाठी धमकावले. महिलेने त्याला विरोध करताच त्याने तोंड, पोट आणि पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर 3 ग्रॅमचे मंगळसूत्र व 1 ग्रॅमचे कानातील कुडके ओरबाडून घेतले. महिलेने आरडाओरड केली, मात्र आसपास कोणीही नसल्याने मदतीसाठी कोणी आले नाही. नराधम आरोपी दागिने ओरबाडून शांत झाला नाही. त्याची अचानक नियत फिरली आणि त्याने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.
आरोपी रेकॉर्डवरील दरोडेखोर....
महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन त्यावरून आरोपीचा शोध घेतला असता, शक्तूर भोसले हाती लागला. विशेष म्हणजे शक्तूर हा रेकॉर्डवरील दरोडेखोर असून, त्याविरोधात सिल्लेगाव, गंगापूर, वैजापूर, पूर्णा (जि. परभणी) येथील पोलीस ठाण्यांत तब्बल सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, लूटमार, वाटमारी या सर्व गुन्ह्यांचा समावेश असून वाटमारी व बलात्काराचा हा आठवा गंभीर गुन्हा आहे. तर त्याला गतवर्षी सिल्लेगाव पोलिसांनी अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! पीएफआयच्या रडारवर होते वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायाधीश; एटीएसचा न्यायालयात मोठा खुलासा