Aurangabad: विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वैजापूर महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प
Aurangabad: सरकारने शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार हेक्टरी भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Aurangabad News: आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मांजरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार हेक्टरी भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र प्रशासनाकडून अजूनही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत. त्यात सरकराने जाहीर केलेली मदत खूपच कमी असून, त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार हेक्टरी भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी गंगापूरच्या मांजरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुऊ केले आहे.
वैजापूर-गंगापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा...
गंगापूरहून वैजापूरला जाणाऱ्या राज्य महामार्गावरील मांजरी फाट्यावर किमान दोन-तीनशे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने लांबपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तर लांबच-लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून,वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.